लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 12:13 IST2025-10-26T12:12:17+5:302025-10-26T12:13:01+5:30
घरामध्ये कार्यक्रम सुरू असताना वधूची तब्येत अचानक बिघडली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलें

फोटो - AI
घरामध्ये लग्नाची जोरदार तयारी सुरू होती, नातेवाईक जमले होते. २० वर्षीय पूजाचं २४ ऑक्टोबर रोजी लग्न होणार होतं, पण त्याआधीच एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्या घरातून वरात निघणार होती, तिथून अंत्ययात्रा काढण्यात आली. पंजाबमधील फरीदकोट जिल्ह्यात ही घटना घडली. २४ ऑक्टोबर रोजी लग्न होणाऱ्या पूजाचा मृत्यू झाला. या मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला. घरामध्ये कार्यक्रम सुरू असताना वधूची तब्येत अचानक बिघडली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
पूजाच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होती, घरामध्ये नाचत, गात होती. सर्वत्र उत्सवाचं वातावरण होतं, पण याच दरम्यान पूजाला हार्ट अटॅक आला. कुटुंबाने तिला ताबडतोब गावातील सरकारी रुग्णालयात नेलं, जिथे डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केलं. पूजाच्या अचानक मृत्यूमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली. स्थानिकांच्या मते, पूजा पूर्णपणे निरोगी होती आणि दिवसभर तिच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होती.
पोलिसांनी तपास सुरू केला आहे आणि मृत्यूचे नेमकं कारण शोधण्यासाठी पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहे. बरगडी गावातील २० वर्षीय पूजाच्या अचानक मृत्यूने संपूर्ण परिसराला मोठा धक्का बसला आहे. तिचा विवाह २४ ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाशी होणार होता. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने लग्नाची जोरात तयारी सुरू होती.
पूजाचे वडील हरजिंदर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी नातेवाईक आणि गावकऱ्यांच्या मदतीने तब्बल पाच लाख रुपये जमवले होते जेणेकरून त्यांच्या मुलीच्या लग्नात कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये. घरी जोरदार तयारी सुरू होती, नातेवाईक लग्नासाठी आले होते. लग्नामुळे पूजा खूप आनंदी होती. ती आणि तिचा भाऊ सजावट आणि समारंभांची तयारी करत होते. पण आता आनंदावर विरजण पडलं आहे.