बाथरुममध्ये गेली अन् जीव गमावून बसली; वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तरुणीसोबत काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 15:58 IST2026-01-01T15:58:18+5:302026-01-01T15:58:53+5:30
२२ वर्षांच्या मुनमुन चितवान या तरुणीचा अचानक मृत्यू झाला.

फोटो - ABP News
पंजाबमधील जालंधरच्या मीठा बाजार परिसरात एका वेदनादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. २२ वर्षांच्या मुनमुन चितवान या तरुणीचा अचानक मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, आंघोळ करत असताना बाथरूममधील गीझरच्या पाईपमधून गॅस लिक झाला. यामुळे मुनमुनला श्वास घेण्यास त्रास झाला आणि ती बेशुद्ध पडली. कुटुंबीयांना काही समजण्यापूर्वीच खूप उशीर झाला होता.
दुसऱ्याच दिवशी मुनमुनचा वाढदिवस होता. घरात वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची जय्यत तयारी सुरू होती, मात्र आनंदाच्या या वातावरणाचं रूपांतर अचानक शोकात झालं. मुनमुन चितवान नेहमीप्रमाणे बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली होती. याच दरम्यान गीझरच्या पाईपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गॅस लिक व्हायला सुरुवात झाला.
बाथरूम बंद असल्याने तिथे गॅस मोठ्या प्रमाणात होता, ज्यामुळे तिचा श्वास कोंडला आणि ती तिथेच बेशुद्ध पडली. बराच वेळ होऊनही ती बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी दरवाजा ठोठावला, पण आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काहीतरी अघटित घडल्याच्या भीतीने दरवाजा तोडला असता मुनमुन बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
डॉक्टरांच्या प्राथमिक तपासणीनुसार, गॅस लिक झाल्यामुळे श्वास गुदमरल्याने तिचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट व्हावे यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
वडिलांनी सांगितलं की, नवीन वर्षाच्या दिवशीच मुलीचा वाढदिवस होता, त्यासाठी खास नियोजन केलं होतं. नातेवाईक आणि मित्रांना बोलावलं जाणार होतं, पण त्याआधीच ती धक्कादायक घटना घडली आहे. मुनमुन अत्यंत सुशिक्षित आणि मनमिळावू स्वभावाची होती. तिच्या अकाली जाण्याने केवळ कुटुंबातच नव्हे, तर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.