sugarcane rate: बेळगावातही ऊस दरवाढीवरुन आंदोलन तापले; कर्नाटकच्या मंत्र्यांची गाडी अडवली, शाब्दिक चकमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 12:24 IST2025-11-06T12:23:22+5:302025-11-06T12:24:04+5:30
चर्चेत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला

sugarcane rate: बेळगावातही ऊस दरवाढीवरुन आंदोलन तापले; कर्नाटकच्या मंत्र्यांची गाडी अडवली, शाब्दिक चकमक
अथणी : बेळगाव जिल्ह्यातील गुरलापूर क्रॉस येथे ऊस दरवाढीसाठी सुरू असलेल्या शेतकरीआंदोलनाचा बुधवारी सातवा दिवस होता. शेतकरी संघटनांनी ३५०० रुपये ऊसदरासाठी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व शशिकांत प्रसंगी व चिनप्पा पुजारी करत आहेत. राज्य सरकारकडून तोडगा काढण्यासाठी कायदामंत्री एच. के. पाटील यांना आंदोलनस्थळी पाठविण्यात आले. मात्र, चर्चेत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
मंत्री पाटील यांच्या गाडीसमोर शेतकरी नेत्यांनी झोपून आंदोलन केले. पोलिसांनी हस्तक्षेप करत शेतकऱ्यांना आंदोलन स्थळावरून बाहेर काढले. यावेळी एक तास शाब्दिक चकमक झाली. तोडगा न निघाल्याने शेतकरी संघटनांनी ७ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे.
त्याच दिवशी बंगळुरू येथे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, राज्य भाजप अध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांना पाठिंबा जाहीर केला. त्यांनी ‘३५०० रुपये दर मिळाल्याशिवाय हे आंदोलन मागे घेता कामा नये,’ असे सांगून शेतकऱ्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला.