लोकसभेला प्रस्ताव नाकारलेला; कमल हसन राज्यसभेवर जाणार? डीएमकेने एक जागा सोडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 12:09 IST2025-05-28T12:09:08+5:302025-05-28T12:09:35+5:30
Rajya Sabha Election: द्रमुकने चारपैकी तीन जागा आपल्या पक्षातील उमेदवारांना ठेवल्या असून लोकसभेला साथ दिल्याने राजकीय क्षेत्रात उतरलेला कमल हसनच्या मक्कल निधी मय्यमला एक जागा सोडली आहे.

लोकसभेला प्रस्ताव नाकारलेला; कमल हसन राज्यसभेवर जाणार? डीएमकेने एक जागा सोडली
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या घोषणांना सुरुवात झाली आहे. १९ जूनला ही निवडणूक होत असून तामिळनाडूमधून एक मोठे नाव समोर येत आहे. सत्ताधारी पक्ष डीएमकेने सहापैकी चार जागांवर निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. यात प्रसिद्ध अभिनेता कमल हसन यांना उमेदवारी जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे.
द्रमुकने चारपैकी तीन जागा आपल्या पक्षातील उमेदवारांना ठेवल्या असून लोकसभेला साथ दिल्याने राजकीय क्षेत्रात उतरलेला कमल हसनच्या मक्कल निधी मय्यमला एक जागा सोडली आहे. आता हा पक्ष कमल हसन यांना उमेदवारी देतो की अन्य कोणा नेत्याला याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
डीएमकेने पी. विल्सन यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. याचबरोबर एसआर शिवलिंगम, लेखक रुकय्या मलिक उर्फ कविगनर सलमा यांनाही तिकीट दिले आहे.
लोकसभा नाकारलेली...
लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये कमल हसन यांच्या मक्कल निधी मय्यम पक्षाने तामिळनाडूमध्ये द्रमुकला साथ देत आघाडीत प्रवेश केला होता. यावेळी हसन यांना लोकसभा किंवा राज्यसभेचा प्रस्ताव डीएमकेने ठेवला होता. परंतू, हसन यांनी लोकसभा निवडणुक लढविण्यास नकार दिला होता. यामुळे हसन आता राज्यसभा लढविणार की नाही याकडे सर्व सिनेजगतासह राजकारण्यांचे लक्ष लागले आहे.
पक्षीय बलाबल काय...
विधानसभेत द्रमुककडे १३४ आमदार आहेत. यामुळे राज्यसभेच्या सहा जागांपैकी चार जागा जिंकू शकतात. उर्वरित दोन जागा अण्णाद्रमुककडे जाण्याची शक्यता आहे. या पक्षाने भाजपाशी युती केली आहे. आसाममधील दोन आणि तामिळनाडूमधील सहा राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ जून आणि जुलैमध्ये संपत असल्याने या निवडणुका होत आहेत. निवडणूक आयोगाने सोमवारी द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा केली. यासाठीची अधिसूचना २ जून रोजी जारी केली जाणार आहे.