मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 18:27 IST2025-07-16T18:26:30+5:302025-07-16T18:27:04+5:30
Punjab Crime News: वडिलोपार्जित मालमत्ता संपत्ती यामुळे अनेक कुटुंबांमधील वाद विकोपाला जातात. दरम्यान, कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून धाकट्या भावाने मोठ्या भावाच्या कुटुंबीयांच्या अंगावर गाडी घातल्याची धक्कादायक घटना पंजाबमधील धर्मकोट भागातील गट्टी जट्टा गावात घडली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
वडिलोपार्जित मालमत्ता संपत्ती यामुळे अनेक कुटुंबांमधील वाद विकोपाला जातात. दरम्यान, कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून धाकट्या भावाने मोठ्या भावाच्या कुटुंबीयांच्या अंगावर गाडी घातल्याची धक्कादायक घटना पंजाबमधील धर्मकोट भागातील गट्टी जट्टा गावात घडली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार गट्टी जट्टा गावातील रहिवासी असलेल्या सुरजीत सिंह यांना तीन मुलं आहेत. काही दिवसांपूर्वीपर्यंत सुरजित सिंह हे धाकटा मुलगा दिलबाग सिंह याच्यासोबत राहत होते. मात्र मालमत्तेच्या वादामुळे एक महिन्यापूर्वी जिलबाग सिंह याने त्याच्या आई-वडिलांना घराबाहेर काढले. त्यानंतर हे वृद्ध आई-वडील मोठा मुलगा बलविंदर सिंह याच्याकडे राहायला गेले.
१४ जुलै रोजी बलविंदर सिंह हा त्याची पत्नी आणि मुलीसोबत घराच्या गेटवर उभा असताना दिलबाग सिंह हा पत्नीसोबत गाडीमधून तिथे आला. त्याने पत्नीला गाडीतून खाली उतरवले. त्यानंतर गाडीचा वेग वाढवत ती बलविंदर सिंह याच्या कुटुंबीयांच्या अंगावर घातली. या घटनेत बलविंदर सिंह, त्याची पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाले आहेत. आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक गोळा झाले. त्यानंतर त्यांनी जखमींना मोगा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, दिलबाग सिंह हा बऱ्याच दिवसांपासून डूख धरून होता. तसेच त्याने धमक्याही दिल्या होत्या, असे बलविंदर सिंह यांनी सांगितले. या प्रकरणी बलविंदर सिंह याने दिलेल्या जबाबाच्या आधारावर दिलबाग सिंह आणि त्याच्या पत्नीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलीस पुढील तपास करत आहेत.