लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 05:54 IST2025-10-06T05:54:25+5:302025-10-06T05:54:45+5:30
पंजाब-हरयाणा हायकोर्टाचे निरीक्षण

लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
चंडीगढ : लष्कराच्या सेवेतील दीर्घकाळचा तणाव व श्रमांमुळे कर्करोगासारखा गंभीर आजार होऊ शकतो, असे निरीक्षण नोंदवत पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयानेकर्करोगाने मृत्यू पावलेल्या जवानाच्या कुटुंबीयांना कौटुंबिक पेन्शन देण्याचे केंद्राला आदेश दिले. धूम्रपानामुळे होणारा कर्करोग वगळता, उर्वरित कर्करोग लष्करी सेवेशी संबंधित मानले आहेत, असे न्यायालयाने केंद्राच्या निदर्शनास आणून दिले.
लष्कराचा आक्षेप : कुमारी सिलोचना वर्मा यांच्या भारतीय लष्कराच्या सेवेत असणाऱ्या मुलाचे २४ जून २००९ साली दुर्मीळ कर्करोगाने मृत्यू झाला होता; पण लष्कराच्या वैद्यकीय बोर्डाने हा कर्करोग लष्करी सेवेशी संबंधित नाही, असे नमूद करत वर्मा यांच्या कुटुंबीयांना मिळणारी विशेष कौटुंबिक पेन्शन नाकारली होती.
या खटल्याच्या निकालपत्रात न्यायालयाने २०१३च्या ‘धरमवीर सिंग विरुद्ध संघराज्य’ या खटल्याचा दाखला देत एखादा सैनिक भरतीच्या वेळी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आढळतो; पण त्याला नंतर एखादा आजार झाला व बळावल्यास तो लष्करातील सेवेमुळे वाढला किंवा लष्करी सेवेशी संबंधित आहे, असे गृहीत धरले जाते.
वर्मा यांच्या मुलाला २००३ साली लष्करात भरतीवेळी कोणताही आजार नव्हता. त्यांच्या वैद्यकीय तपासणीत ते सुदृढ आढळले होते. त्यांना कर्करोग नंतर झाला आणि त्यांचा आजार एका दिवसात उफाळला नाही तर तो प्रत्येक दिवशी बळावत गेला. याला कारण सेवेतील ताणतणाव असल्याचे निरीक्षण न्यायालयाने मांडले.
तसेच न्यायालयाने या आजाराचा लष्करी सेवेशी संबंध नव्हता, हे दाखवण्यासाठी कोणताही ठोस पुरावा, सामग्री किंवा सविस्तर वैद्यकीय रेकॉर्ड केंद्राने सादर केलेले नाही, असेही निदर्शनास आणून दिले.