'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 17:23 IST2025-12-08T17:22:58+5:302025-12-08T17:23:58+5:30
'वंदे मातरमवरील चर्चेतून देशाचे लक्ष खऱ्या मुद्द्यांपासून दूर नेले जात आहे. '

'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
Priyanka Gandhi in LokSabha: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्' गीतावरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेत्या आणि खासदार प्रियंका गांधी यांनी सरकारवर तीव्र टीका केली. त्यांनी म्हटले की, वंदे मातरम् देशाच्या कणाकणात आहे. मग या विषयावर चर्चा करण्याची गरजच काय होती? ही चर्चा आगामी पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केल्याचा आरोपही त्यांनी केला.
इतक्या वर्षांनंतर वंदे मातरमवर चर्चा का?
प्रियंका गांधी म्हणाल्या की, वंदे मातरम् हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील बलिदान आणि वेदनेची आठवण करून देणारे गीत आहे. वंदे मातरमचा उच्चार केला की स्वातंत्र्य लढ्याचा संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर येतो. वंदे मातरम 150 वर्षांपासून आपल्या देशाचा भाग आहे. मग आज या चर्चेची गरज काय आहे? यामागे सरकारचा हेतू काय आहे?
LIVE: Smt. @priyankagandhi ji speaks in Parliament on the 150th anniversary of 'Vande Mataram' https://t.co/ocFwdcj2vQ
— Congress (@INCIndia) December 8, 2025
बंगालच्या निवडणुकांसाठी राजकीय खेळी?
सरकारवर आरोप करत प्रियंका गांधी पुढे म्हणाल्या, या चर्चेमागे दोन कारणे आहेत. पहिले- पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुका आणि दुसरे- इतिहासात ज्यांनी बलिदान दिले, त्यांच्यावर नवे आरोप लादण्याचा प्रयत्न. हे सरकार भविष्याकडे पाहत नाही. लोकांच्या खरी समस्यांपासून लक्ष विचलित करणे हाच त्यांचा उद्देश असतो.
आजचे पंतप्रधान आधीसारखे राहिले नाहीत
मोदीजी उत्तम भाषण करतात, पण तथ्यांच्या बाबतीत कमकुवत पडतात. आजचे पंतप्रधान पूर्वीसारखे दिसत नाहीत. त्यांच्या धोरणांमुळे देश कमकुवत होत आहे. देशातील जनता महागाई, बेरोजगारी आणि सुरक्षेच्या प्रश्नांनी त्रस्त आहे, पण सरकार यावर चर्चा करत नाही. आज देशातील लोक खुश नाहीत. बेरोजगारी, महागाई, गुन्हे, प्रदूषण यावर चर्चा नाही; पण वंदे मातरमवर चर्चा चालू आहे.
नेहरुंच्या भूमिकेची आठवण
प्रियंका गांधींनी पंडित जवाहरलाल नेहरुंच्या योगदानाचा उल्लेख करत सरकारवर टोला लगावला. त्या म्हणाल्या, जर नेहरुंनी इस्रो उभारले नसते, तर आज तुम्ही चंद्र मोहिमा केल्या असत्या का? यावेळी प्रियंकांनी आव्हान दिले की, सरकारने एकदा नेहरुंवर चर्चा करायला हवी. वंदे मातरमवरील चर्चेतून देशाचे लक्ष खऱ्या मुद्द्यांपासून दूर नेले जात आहे. महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, प्रदूषण या गंभीर मुद्द्यांवर चर्चा न करता सरकार छोटीशी चर्चा करून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.