पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा रद्द, आता एस. जयशंकर करणार UNGA मध्ये भारताचं प्रतिनिधित्व
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 09:53 IST2025-09-06T09:30:13+5:302025-09-06T09:53:06+5:30
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या महिन्याच्या अखेरीस होणारा अमेरिकेचा दौरा रद्द करण्यात आला असून, त्यामुळे नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या बैठकीत सहभागी होणार नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा रद्द, आता एस. जयशंकर करणार UNGA मध्ये भारताचं प्रतिनिधित्व
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारत पाकिस्तानमध्ये युद्धविराम घडवून आणल्याचा दावा आणि भारतावर लादलेलं अतिरिक्त टॅरिफ यामुळे सध्या भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंध कमालीचे बिघडले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या महिन्याच्या अखेरीस होणारा अमेरिकेचा दौरा रद्द करण्यात आला असून, त्यामुळे नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या बैठकीत सहभागी होणार नाहीत. त्यांच्या जागी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. सभेतील वक्त्यांची सुधारित यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचं ८०वं अधिवेशन हे ९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तर २३ ते २९ सप्टेंबरदरम्यान, उच्चस्तरीय बैठक होणार आहे. या बैठकीत पहिला वक्ता ब्राझील असेल, तर त्यानंतर अमेरिका आमसभेला संबोधित करणार आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २३ सप्टेंबर रोजी यूएनजीएच्या पोडियमवरून जगाला संबोधित करतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प हे दुसऱ्या कार्यकाळात पहिल्यांदा संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करणार आहेत.
भारताकडून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर २७ सप्टेंबर रोजी या अधिवेशनाला संबोधित करतील. यापूर्वी जुलै महिन्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आमसभेतील वक्त्यांच्या यादीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव होतं. तसेच मोदी हे २६ सप्टेंबर रोजी आमसभेला संबोधित करणार होते. मात्र आता त्यांचा दौरा रद्द झाल्याने यात बदल करण्यात आला आहे.