खुद्द पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवलेली बस परत धावलीच नाही...हे आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 16:31 IST2018-09-30T16:30:07+5:302018-09-30T16:31:31+5:30
11 मे रोजी मोदी यांनी नेपाळच्या जनकपूर ते अयोध्या बससेवेला हिरवा झेंडा दाखविला होता. या दोन्ही बसेस काठमांडूमध्ये धुळ खात उभ्या केलेल्या आहेत.

खुद्द पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवलेली बस परत धावलीच नाही...हे आहे कारण
मधुबनी : पंतप्रधान नरेंद्र मोदी योजनांची सुरुवात करतात खरी परंतू त्यापैकी किती योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात याबाबत शंकाच आहे. 11 मे रोजी मोदी यांनी नेपाळच्या जनकपूर ते अयोध्या बससेवेला हिरवा झेंडा दाखविला होता. मात्र, या बसेस पहिल्या दिवशी रवाना झाल्या त्या पुन्हा कधी धावल्याच नाहीत. या दोन्ही बसेस काठमांडूमध्ये धुळ खात उभ्या केलेल्या आहेत. मोदी यांनी बेकायदेशीररित्या या बसना हिरवा झेंडा दाखविल्याचे आता उघड होत आहे.
एका वृत्तसंस्थेने केलेल्या छाननीमध्ये ही बाब उघड झाली आहे. दोन्ही देशांचे अधिकाऱ्यांना 11 मे रोजीच माहिती होते की, या बस आजपासून कधी चालवायच्याच नाहीत. तरीही दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या हस्ते या बस रवाना करण्यात आल्या होत्या.
धक्कादायक म्हणजे, या बसमधून जाणारे यात्रेकरू दाखविण्यासाठी आदल्या दिवशी नेते आणि अधिकाऱ्यांच्या ओळखीच्या लोकांना गोळा करण्यात आले. यापैकी बऱ्याचजनांना तर 9, 10 मे रोजी फोन करून सांगण्यात आले. तसेच त्यांना सांगण्य़ात आले की अयोध्येला जायचे आहे, राहण्याची-जेवणाची सुविधा मोफत आहे. यामुळे हे लोकही अयोध्ये वारीला तयार झाले.
काठमांडूमध्ये धूळ खात उभ्या आहेत दोन्ही बस
या बस दोन्ही देशांदरम्यान चालविण्यासाठी लागणारा करारही करण्यात आला नव्हता. याबाबत माहीती असूनही बस त्यादिवशी भारतात पाठविण्यात आल्या. यावेळी अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी महिन्याभरानंतर बससेवा नियमित सुरु करण्यात येईल. मात्र, चार महिन्यांनंतरही या बस काठमांडूमध्ये उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे या बस खासगी आहेत. बसचे मालक दीपक थापा यांना या मार्गावर बस चालविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तर, अयोध्या ते जनकपूर चाललेली बस ही गंगोत्री ट्रॅव्हल्सची होती. ती आता तिच्या जुन्या मार्गावरच चालू आहे.
Janakpur and Ayodhya are being connected. This is a historic moment: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 11, 2018
एमओयू पुन्हा झालाच नाही...
पंतप्रधान मोदी यांनी सुरु केलेल्या बससेवेचा करारच झाला नव्हता. आधी 2014 मध्ये अयोध्या आणि जनकपूर धाम या शहरांच्या महापौरांमध्ये करार झाला होता. पण तो 2017 मध्येच संपला होता. नवीन करार न करताच मोदी यांनी बसला हिरवा झेंडा दाखविला. नवीन करार अद्याप व्हायचा आहे.