आईच्या पिंडदानाची तयारी सुरू होती, तेवढ्यात फोन खणखणला अन्...; असं काही घडलं की सगळेच झाले हैराण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 10:48 IST2026-01-13T10:47:46+5:302026-01-13T10:48:27+5:30
ज्या माऊलीला मृत मानून तिचा मुलगा तिच्या पिंडदान आणि श्राद्धाची तयारी करत होता, तीच आई तब्बल अडीच वर्षांनंतर जिवंत असल्याची बातमी समोर आली.

आईच्या पिंडदानाची तयारी सुरू होती, तेवढ्यात फोन खणखणला अन्...; असं काही घडलं की सगळेच झाले हैराण!
नशिबाचे फासे कधी आणि कसे पलटतील याचा नेम नाही. आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातून 'मरणाने केली सुटका, पण देवाने मारले' या म्हणीचा प्रत्यय देणारी एक थरारक आणि तितकीच भावूक घटना समोर आली आहे. ज्या माऊलीला मृत मानून तिचा मुलगा तिच्या पिंडदान आणि श्राद्धाची तयारी करत होता, तीच आई तब्बल अडीच वर्षांनंतर जिवंत असल्याची बातमी समोर आली. या एका फोन कॉलने शोकमग्न कुटुंबात आनंदाचे उधाण आले असून, हा चमत्कार सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरला आहे.
हॉस्पिटलमधून बेपत्ता आणि पतीचा विरह
प्रकाशम जिल्ह्यातील एल. कोटा गावातील वेंकटालक्ष्मी यांची ही कहाणी आहे. वेंकटालक्ष्मी यांची मानसिक स्थिती थोडी खालवलेली होती. अडीच वर्षांपूर्वी कुटुंबियांनी त्यांना उपचारासाठी गुंटूर येथील एका रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तिथून त्या अचानक बेपत्ता झाल्या. नातेवाईकांनी आकाशपाताळ एक केले, पण वेंकटालक्ष्मी यांचा कुठेच पत्ता लागला नाही. पत्नीच्या विरहाने खचलेल्या त्यांच्या पतीचेही तीन दिवसातच निधन झाले, ज्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
पिंडदानाच्या दिवशीच मृत्यूला दिला चकवा
अडीच वर्षे उलटूनही आईचा पत्ता न लागल्याने, अखेर कुटुंबाने जड अंतःकरणाने त्यांना मृत मानले. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आईच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून मुलगा गुरवैया पिंडदान आणि श्राद्ध विधीची तयारी करत होता. घरात सुतक आणि दुःखाचे वातावरण होते. विधीला काही काळ उरला असतानाच गुरवैयाचा फोन खणखणला. खम्मम येथील 'अन्नम सेवा आश्रमा'तून हा फोन होता. "तुमची आई आमच्याकडे सुरक्षित आहे," हे शब्द ऐकताच मुलाच्या पायाखालची जमीनच सरकली.
अशी झाली भेट...
जुलै २०२३ मध्ये खम्मम पोलिसांना वेंकटालक्ष्मी रस्त्यावर भटकताना आढळल्या होत्या. त्यांनी त्यांना अन्नम सेवा आश्रमात दाखल केले. आश्रमाचे संचालक अन्नम श्रीनिवास राव यांनी त्यांची अहोरात्र सेवा केली. योग्य उपचार मिळाल्यामुळे त्यांच्या मानसिक स्थितीत सुधारणा झाली आणि त्यांना आपले गाव व मुलाचे नाव आठवले.
जेव्हा मुलगा गुरवैया आश्रमात पोहोचला, तेव्हा आपल्या आईला पाहताच त्याला अश्रू अनावर झाले. आईला मिठी मारून तो ढसाढसा रडला. ज्या घरामध्ये काही तासांनंतर श्राद्धाचे जेवण दिले जाणार होते, त्याच घरात आता आईच्या आगमनामुळे उत्सवाचे वातावरण आहे. मानवता आणि निस्वार्थ सेवेचे हे उत्तम उदाहरण असून, अन्नम सेवा आश्रमाच्या प्रयत्नांमुळे एका मुलाला त्याची 'हरवलेली' आई पुन्हा मिळाली आहे.