मजा येतेय? अजून घालशील का जन्माला? नर्सने बेड न दिल्याने महिलेला जमिनीवरच दिला बाळाला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 16:19 IST2025-10-03T16:16:11+5:302025-10-03T16:19:05+5:30
उत्तराखंडमध्ये गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिल्याचे प्रकरण समोर आलं आहे.

मजा येतेय? अजून घालशील का जन्माला? नर्सने बेड न दिल्याने महिलेला जमिनीवरच दिला बाळाला जन्म
Haridwar Hospital Floor Delivery:उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये कर्मचाऱ्यांनी मदत करण्यास नकार दिल्याने एका गर्भवती महिलेला रुग्णालयाच्या जमिनीवर बाळंतपणव करावं लागलं. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी एवढ्यावरच न थांबता महिलेला खालच्या दर्जाच्या भाषेत हिणावलं. या घटनेच्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. विरोधी काँग्रेस पक्षाने या घटनेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतल्यानंतर रुग्णालय प्रशासनावर कारवाई करण्यात आली आहे.
गरीब कुटुंबातील ही महिला ३० सप्टेंबर रोजी प्रसुती वेदनांमुळे रात्री उशिरा रुग्णालयात आली होती. पण तिला दाखल करण्यास नकार देण्यात आला असा आरोप तिच्या कुटुंबीयांचा आहे. कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला. आम्ही प्रसूती करू शकणार नाही असे सांगत कर्मचाऱ्यांनी तिला दाखल करुन घेतलं नाही.
पीडित महिला रात्री ९:३० वाजता रुग्णालयात पोहोचली होती. रुग्णालयाच्या जमिनीवर ती वेदनेने तडफडत पडली होती. अखेर मध्यरात्री १:३० वाजता तिने बाळाला जन्म दिला. यावेळी तिला कोणतीही वैद्यकीय मदत देण्यात आली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी रुग्णालयात आलेल्या महिलेच्या नातेवाईकांनी तिच्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी सांगितली.
सकाळी आम्ही रुग्णालयात पोहोचलो तेव्हा तिने (आम्हाला सांगितले की कोणीही तिला बेडवर झोपू दिले नाही. बाळंतपणानंतर, जवळ उभ्या असलेल्या दोन परिचारिकांपैकी एकाने तिला, मजा येतेय का? अजून मुलं जन्माला घालशील का? असं विचारलं. गर्भवती महिलेशी असं कोण बोलतं. जर बाळाला काही झाले असते तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती? प्रसूती जमिनीवर झाली. कोणत्याही रुग्णाला असे वागवले जाऊ नये अशी आमची मागणी आहे. लोक इथे आनंदात नाही तर दुःखात येतात, असं पीडितेच्या नातेवाईकांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ज्यामध्ये ती महिला जमिनीवर पडून वेदनेने ओरडताना दिसत आहे. जवळपास रुग्णालयातील कोणताही कर्मचारी दिसत नाही. काँग्रेसने या घटनेवरुन सरकारवर टीका केली. तर दुसरीकडे राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून शासनाने कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरला निलंबित केले आहे. दुसरीकडे, हरिद्वारचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आरके सिंह यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना महिलेची प्रसुती पहाटे १:३० वाजता आपत्कालीन कक्षात प्रसूती करण्यात आल्याचे सांगितले.