प्रयागराज हिंसाचार; मुख्य आरोपीविरोधात मोठी कारवाई, बुलडोझरने घर पाडण्यात येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 14:22 IST2022-06-12T14:21:59+5:302022-06-12T14:22:16+5:30
Prayagraj violence: प्रयागराज हिंसाचाराचा मास्टरमाइंड जावेद पंप याचे बेकायदेशीर असलेले घर बुलडोझरने पाडण्यात येत आहे.

प्रयागराज हिंसाचार; मुख्य आरोपीविरोधात मोठी कारवाई, बुलडोझरने घर पाडण्यात येणार
प्रयागराज: भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्माच्या वक्तव्याच्या निषेधार्थ झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी प्रयागराजमध्ये कारवाई सुरू केली आहे. प्रयागराजच्या अटाळा भागात झालेल्या हिंसाचारप्रकरणी जावेद पंप याला पोलिसांनी अटक केली होती. या हिंसाचाराचा सूत्रधार जावेद पंप असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. आता जावेद पंपच्या अटकेनंतर प्रयागराज विकास प्राधिकरण अर्थात पीडीएही कारवाईत आले आहे.
पोलिसांनी सामान घराबाहेर काढले
पीडीएने जावेद पंपच्या घरावर नोटीस चिकटवून त्यांना घर खाली करण्यास सांगितले होते. त्यानंतर आता मोठा पोलीस फौजफाटा जावेदच्या घरी पोहोचला आहे. पोलीस प्रशासनाने जावेदच्या घराचे छावणीत रूपांतर केले असून, बुलडोझरने घर पाडण्यास सुरुवात केली आहे. पोलीस जावेद पंपच्या घरात घुसले असून, घरातील सामान बाहेर काढले जात आहे. घराच्या पहिल्या मजल्यावर पोहोचल्यावर पोलिसांनी खुर्च्या आणि इतर वस्तूही खाली फेकल्या.
#WATCH | Heavy security force deployed in front of the residence of Prayagraj violence accused Javed Ahmed.
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 12, 2022
Prayagraj Development Authority (PDA) had earlier put a demolition notice at his residence, asking him to vacate the house by 11am today as it is "illegally constructed". pic.twitter.com/sk0KCEVVdm
बेकायदा बांधकाम असल्याची माहिती
पीडीएने दिलेल्या नोटीसमध्ये घरात राहणाऱ्या सर्व लोकांना आज 12 जून रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत त्यांचे सामान काढण्यास सांगितले होते. प्रयागराज विकास प्राधिकरणाने चिकटवलेल्या नोटीसमध्ये बेकायदा बांधकाम असल्याचे म्हटले आहे. प्राधिकरणाची परवानगी न घेता तळमजला आणि पहिला मजला बेकायदेशीरपणे बांधण्यात आल्याचे पीडीएच्या नोटिसीत म्हटले आहे. यासाठी 10 मे 2022 रोजी कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. 24 मे रोजी सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली होती, परंतु जावेद किंवा जावेदचे वकील हजर झाले नाहीत. या संदर्भात कोणतेही रेकॉर्ड तयार करण्यात आलेले नाही.
95 विरोधात गुन्हा दाखल
प्रयागराज हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी 95 नावे आणि पाच हजार अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष शाह आलम, जीशान रहमानी, सपा नगरसेवक फजल खान, दिलशाद मन्सूरी, मजदूर सभेचे नेते आशिष मित्तल आणि टिपू याच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.