"मी सौदी अरेबियात अडकलोय, वाळवंटात उंट...", ढसाढसा रडत तरुणाने मागितली मोदींकडे मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 13:35 IST2025-10-23T13:35:11+5:302025-10-23T13:35:54+5:30
इंद्रजित १ ऑक्टोबर रोजी कामासाठी सौदी अरेबियाची राजधानी रियादला गेला होता. तिथे त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील अंकित भारतीय उर्फ इंद्रजित १ ऑक्टोबर रोजी कामासाठी सौदी अरेबियाची राजधानी रियादला गेला होता. तिथे त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आणि त्याला उंटाला चरायला नेण्याचं काम देण्यात आलं आहे. वाळवंटात अडकलेल्या इंद्रजितने आता पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे घरी परतण्यासाठी मदत मागितली आहे. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
इंद्रजितने दिलेल्या माहितीनुसार, त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आणि त्याला ज्या कामासाठी आणलं होतं ते देण्याऐवजी त्याला वाळवंटात उंट चरायला घेऊन जाण्यास भाग पाडलं. व्हिडिओमध्ये तो ढसाढसा रडतो आणि इकडे एकटा पडलो आहे, खूप भीती वाटतेय असं सांगतो.
इंद्रजित आरोप करतो की, तो त्याची पत्नी पिंकी आणि सासरे राजेश सरोज यांच्या दबावाखाली परदेशात आला होता आणि आता वारंवार त्याच्या आईकडे परत जाण्याची विनंती करतो. त्याचे वडील जयप्रकाश भारतीय प्रयागराजमध्ये काम करतात.
जून २०२० मध्ये इंद्रजितचं लग्न झालं होतं आणि त्याला ३ वर्षांचा मुलगा आणि एका मुलगी आहे. इंद्रजित सौदी अरेबियामध्ये कंटाळल्याचं सांगत आहे. त्याच्या कुटुंबाला त्याची खूप काळजी वाटत आहे. व्हिडीओमध्ये तो खूप रडत असल्याने सर्वांनीच चिंता व्यक्त केली.