गुरूग्राम- प्रद्युम्न ठाकूर हत्या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला सज्ञान समजलं जाईल आणि त्यानुसार त्याच्यावर केस चालविली जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय ज्युवेनाईल कोर्टाने दिला आहे. ज्युवेनाईल कोर्टाने हा निर्णय देताना प्रद्युम्न हत्या प्रकरण जिल्हा आणि सेशन कोर्टात वर्ग केलं आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी 22 डिसेंबर रोजी होणार आहे. 8 सप्टेंबर रोजी गुरूग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रद्युम्न ठाकूर या 8 वर्षाच्या मुलाची चाकूने गळा चिरून हत्या करण्यात आली होती. प्रद्युम्नच्या हत्येनंतर शाळेतील मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. मुलांच्या शाळेतील सुरक्षेबाबत पालकांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
प्रद्युम्नच्या हत्येप्रकरणी आरोपी असणाऱ्या अल्पवयीन मुलाला सज्ञान समजून त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका या प्रकरणाचा तपास करत असणाऱ्या सीबीआयने ज्युवेनाईल कोर्टात दाखल केली होती. तसंच प्रद्युम्नच्या पालकांनीही आरोपी मुलाला सज्ञान समजून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. सीबीआयच्या या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने हा निर्णय दिला आहे. संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या प्रद्युम्न ठाकूर हत्या प्रकरणात सुरूवातीला स्कूल बसचा कंडक्टर अशोकला अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर पोलीस तपासात त्रुटी राहिल्याचं मान्य करत सीबीआयने या प्रकरणाचा तपास सुरू केला. सीबीआयने प्रद्युम्नच्या हत्येप्रकरणी शाळेतील अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला अटक केली.