सत्तेचे वारे..7 सद्गुरू
By Admin | Updated: March 8, 2015 00:30 IST2015-03-08T00:30:52+5:302015-03-08T00:30:52+5:30
मिकी व भाजप

सत्तेचे वारे..7 सद्गुरू
म की व भाजप...............भारतीय जनता पक्षाला गोवा विकास पक्षाचे मंत्री मिकी पाशेको हे कितपत लाभदायी ठरतात हे जिल्हा पंचायत निवडणुकीच्या निकालातून दिसून येणार आहे. पाशेको यांचा वापर करून सासष्टीत काँग्रेसची मते कमी करावी ही भाजपची खेळी राजकीयदृष्ट्या व्यवहार्य आहे. मात्र पाशेको यांच्याकडे काँग्रेसची मोठी हानी करण्याएवढे बळ आहे का हा संशोधनाचा विषय आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी पाशेको यांनी भाजपची उघडपणे साथ दिली. आपल्या नुवे मतदारसंघातून त्यांनी भाजपला मते मिळवून दिली. चर्च संस्था त्यावेळी भाजपच्या विरोधात उभी ठाकली होती. नरेंद्र मोदी पंतप्रधान बनणार ही गोष्ट ख्रिस्ती धर्मगुरुंना छळत होती. त्यामुळे अनेक फादर्स हे उघडपणे भाजपविरुद्ध प्रचार करत होते. त्यावेळी पाशेको यांनी ख्रिस्ती धर्मगुरुंना व चर्च संस्थेलाही आव्हान दिले. पाशेको यांच्या गोवा विकास पक्षाचे दुसरे आमदार कायतू सिल्वा यांनीही त्यावेळी भाजपला साथ देत चर्च संस्थेवर टीका केली होती. याला मते द्या, त्याला देऊ नका, अशी भाषा ख्रिस्ती धर्मगुरुंनी करू नये, असे पाशेको व कायतू यांनी त्यावेळी स्पष्टपणे सांगितले होते. आज जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी मिकी व कायतू हे दोघेही एकमेकांच्या उरावर बसले आहेत. पाशेको यांचे बाणावलीचे आमदार कायतू सिल्वा यांच्याशी पटत नाही. मार्च 2012 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाशेको यांच्या गोवा विकास पक्षाच्या तिकीटावर केवळ दोन आमदार निवडून आले. एक स्वत: मिकी व दुसरे कायतू सिल्वा. वास्तविक कायतू ही लो प्रोफाईल व्यक्ती. त्यांना पाहिल्यावर कुणी ते आमदार आहेत असे सहसा म्हणणार नाही, एवढे त्यांचे वागणे व पोषाखही साधा आहे. भाजपचे नेते मनोहर र्पीकर यांच्याशी त्यांची नाळ जुळली. मात्र पाशेको यांच्याशी त्यांचे गेल्या दोन वर्षांपासून पटत नाही. आता तर दोघांमधील संबंध एकदम ताणले गेले आहेत. बाणावली जिल्हा पंचायत मतदारसंघात कायतू यांनी स्वत:च्या पसंतीचा अपक्ष उमेदवार उभा केला. भाजप-मगो-गोविपाच्या आघाडीने ठेवलेला उमेदवार त्यांना मान्य नाही. याबाबत पाशेको यांनी कायतू यांना कडक शब्दांत समज देण्याचा प्रयत्न केला आहे. कायतू यांनी वाटल्यास पक्ष सोडून जावे, त्यांची पक्षविरोधी कृती आम्ही सहन करणार नाही, असे पाशेको यांचे म्हणणे आहे.