आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 18:45 IST2025-08-14T18:44:54+5:302025-08-14T18:45:19+5:30
Pooja Pal: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केल्यामुळे पूजा पाल यांची हक्कालपट्टी झाली आहे.

आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
Pooja Pal: उत्तर प्रदेशातील चायल विधानसभा मतदारसंघातील समाजवादी पक्षाच्या (सपा) आमदार पूजा पाल यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. त्यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे उघडपणे कौतुक केले होते. त्यांची कृती पक्षविरोधी असल्याचा ठपका ठेवत, अखिलेश यादव यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. पूजा पाल यांच्या या कौतुकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पूजा यांच्या हकालपट्टीची ही घटना त्यांच्या राजकीय प्रवासात एक नवीन वळण आहे.
पूजा पाल यांचे पती राजू पाल हे बसपाचे आमदार होते, ज्यांची २००५ मध्ये लग्नाच्या काही दिवसांनी हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आरोप माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ याच्यावर होता. त्यावेळी प्रयागराजमध्ये अतिक याची भीती इतकी होती की, लोक त्याच्याविरुद्ध बोलण्यास घाबरायचे. परंतु पूजा पाल यांनी हार मानली नाही. पतीसाठी त्यांनी तीव्र लढा दिला.
#WATCH लखनऊ, उत्तर प्रदेश | उत्तर प्रदेश विधानसभा में 'विज़न डॉक्यूमेंट 2047' पर 24 घंटे चली मैराथन चर्चा को संबोधित करती समाजवादी पार्टी की विधायक पूजा पाल ने कहा, "मैंने अपना पति खोया है, सब जानते हैं कि मेरे पति की हत्या कैसे हुई और किसने की। मैं मुख्यमंत्री को धन्यवाद करती… pic.twitter.com/7RM7OGBauK
— ANI_HindiNews (@AHindinews) August 14, 2025
राजकीय प्रवास आणि भाजपशी संबंध
राजकारणाचा अनुभव नसतानाही, पूजा पाल यांनी शहर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजयी झाल्या. त्या बसपाकडून दोनदा आमदार झाल्या आणि नंतर समाजवादी पक्षात सामील झाल्या. सध्या सपाच्या तिकिटावर तिसऱ्यांदा आमदार आहेत. मात्र, आता भाजपची स्तुती केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळेच आगामी काळात त्या भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय म्हणाल्या पूजा पाल?
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक करताना पूजा पाल म्हणाल्या होत्या की, भाजप सरकारने महिलांवरील अत्याचारांवर झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारले आहे. त्यामुळेच आज अतिक अहमद सारख्या माफियाचा नाश झाला आहे. मी माझ्या पक्षाविरोधात नाही, मात्र मुख्यमंत्र्यांच्या एका निर्णयाने मला वैयक्तिकरित्या खूप दिलासा मिळाला आहे. म्हणूनच मी उघडपणे मुख्यमंत्र्यांचे कौतुक करते.
हकालपट्टीनंतर पूजा काय म्हणाल्या?
हकालपट्टीनंतर पूजा पाल यांनी सपावर निशाणा साधला आणि म्हणाल्या, कदाचित त्यांना प्रयागराजच्या त्या महिलांचे ऐकूण घ्यायचे नाही, ज्यांना माझ्यापेक्षा जास्त त्रास झाला होता. पण मी त्यांचा आवाज आहे. मी त्या माता-बहिणींचा आवाज आहे, ज्यांनी त्यांचे प्रियजन गमावले आहेत. त्यांनीच मला आमदार म्हणून विधानसभेत पाठवले आहे. मीदेखील इतर महिलांप्रमाणे पीडित आहे. माझ्या पतीची दिवसाढवळ्या हत्या झाली होती. मुख्यमंत्र्यांनी प्रयागराजमध्ये अतिक अहमदमुळे त्रास झालेल्या सर्व लोकांना न्याय दिला आहे, अशी प्रतिक्रिया पूजा यांनी दिली.
काय आहे राजू पाल हत्या प्रकरण?
माफिया अतिक आणि त्याच्या भावावर राजू पाल यांच्या हत्येचा आरोप होता. राजू पाल यांनी भावाचा निवडणुकीत पराभव केल्यामुळे अतिकने राजू यांची हत्या केली होती. या प्रकरणात उमेश पाल महत्त्वाचे साक्षीदार होते. परंतु गेल्या वर्षी उमेश पाल यांचीही गोळ्या आणि बॉम्बने हल्ला करून हत्या करण्यात आली. त्या घटनेच्या काही महिन्यांनंतर १५ एप्रिल २०२३ रोजी अतिक आणि त्याचा भाऊ अशरफची पोलिसांसमोर काही हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली होती. तर, उमेश पाल हत्येत सहभागी असलेल्या अतिकचा मुलगा असदलाही पोलिसांनी चकमकीत ठार मारले.