धर्माशिवाय राजकारण निरर्थक - नड्डा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 03:28 AM2020-01-04T03:28:16+5:302020-01-04T03:28:22+5:30

भाजप सकारात्मक विचारांचा पक्ष; धर्म ही एक प्रकारची आचारसंहिता असते

Politics without religion is meaningless - Nadda | धर्माशिवाय राजकारण निरर्थक - नड्डा

धर्माशिवाय राजकारण निरर्थक - नड्डा

Next

वडोदरा : धर्म माणसाला नैतिक आचरणाचे धडे देतो. धर्माशिवाय राजकारण निरर्थक आहे, असे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी म्हटले आहे. स्वामीनारायण पंथातर्फे येथे शुक्रवारी आयोजिलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

नड्डा म्हणाले की, राजकारणाचा धर्माशी काय संबंध, असा प्रश्न वारंवार विचारला जातो. धर्माशिवाय राजकारण हे विवेकहीन ठरेल. राजकारण व धर्म एकमेकांच्या हातात हात घालून चालले पाहिजेत. धर्म ही एक प्रकारची आचारसंहिता असते. काय करावे व काय करू नये, याची शिकवण त्याच्याकडून मिळते. त्यासाठी धर्माची नितांत आवश्यकता आहे. राजकारणात तर त्याची मोठी गरज आहे. भाजप हा सकारात्मक विचारांचा पक्ष आहे. देशाच्या व समाजाच्या भल्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, याचा विचार करून भाजप कृती करतो, असा दावाही त्यांनी केला.

त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधकांनी जेव्हा जेव्हा रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा मोदी यांनी सारे अडथळे दूर सारले व आपले कार्य आणखी जोमात सुरू ठेवले. अशा खडतर काळात पंतप्रधानांच्या अंगी आणखी ऊर्जा संचारते. देशाच्या विकासासाठी मोदी सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत केले जातात. गरीब कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी देण्याकरिता राबविलेली उज्ज्वला योजना अतिशय सफल ठरली आहे, असाही दावा नड्डा यांनी केला. (वृत्तसंस्था)

देशातील वनक्षेत्रामध्ये वाढ
जे.पी. नड्डा म्हणाले की, मोदी यांच्या राजवटीत भारतातील वनक्षेत्रामध्ये वाढ झाली आहे.
घराघरांमध्ये स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर पोहोचल्याने जंगलातून जळणासाठी लाकूडफाटा तोडून आणण्याचे व चुलीवर स्वयंपाक करण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.
उज्ज्वला योजनेंतर्गत देशात स्वयंपाकाच्या गॅसच्या ८ कोटी जोडण्या आतापर्यंत देण्यात आल्या. चुलीच्या धुराच्या त्रासापासून सुटका झाल्यामुळे घराघरांतील महिलांचे आरोग्यही सुधारले आहे.

सीएएविरोधात दिल्लीत मोर्चा
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात नवी दिल्लीत शुक्रवारी महिला आणि विविध समुदायाच्या नागरिकांनी मंडी हाउस ते जंतरमंतरपर्यंत मोर्चा काढला.
या कायद्याविरोधात नाराजी व्यक्त करीत त्यांनी घोषणाबाजी केली.
मालवीयनगर येथील कामगार शांती देवी म्हणाल्या की, असा कायदा आणण्याऐवजी सरकारने गरिबीसारख्या मुद्यांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, तसेच सर्व लोकांना व्यवस्थित अन्न मिळते का? याकडे लक्ष द्यावे.

Web Title: Politics without religion is meaningless - Nadda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.