सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 02:18 IST2025-05-16T02:16:51+5:302025-05-16T02:18:12+5:30
कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल मंत्री विजय शाह यांच्याविरुद्ध पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर दाखल केलेल्या एफआयआरवर उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
जबलपूर: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल मध्यप्रदेशचे मंत्री विजय शाह यांच्याविरुद्ध पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर दाखल केलेल्या एफआयआरवर उच्च न्यायालयाने गुरुवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायमूर्ती अतुल श्रीधरन आणि अनुराधा शुक्ला यांच्या खंडपीठाने म्हटले की, हा एफआयआर केवळ औपचारिकता आहे. आमच्यासमोर ठेवण्यात आलेल्या एफआयआरला आव्हान दिल्यास तो सहज रद्द केला जाऊ शकतो, इतका तो तकलादू आहे.
आता न्यायालय या पोलिस तपासावर देखरेख करेल. कोणत्याही दबावामुळे तपासावर परिणाम होऊ नये म्हणून हे करणे आवश्यक आहे. पोलिसांनी निष्पक्ष तपास करावा, असेही खंडपीठाने नमूद केले. (वृत्तसंस्था)
सर्वोच्च न्यायालयानेही मंत्री शाह यांना फटकारले
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयानेही गुरुवारी मंत्री विजय शाह यांना चांगलेच फटकारले. जेव्हा देशात ‘युद्धजन्य परिस्थिती’ असते तेव्हा मंत्र्यांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द जबाबदारीने उद्गारलेला असावा, असा सल्ला सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिला. न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांचा समावेश असलेले खंडपीठ शुक्रवारी शाह यांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. एफआयआर नोंदविण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला शाह यांनी आव्हान दिले.
...आता व्योमिका सिंह यांची जात काढली
मुरादाबाद : आता विंग कमांडर व्योमिका सिंह यांच्याबद्दल सपा प्रमुख अखिलेश यादव यांचे काका रामगोपाल यादव यांनी वादग्रस्त टिप्पणी केली आहे. व्योमिका यांची जात रामगोपाल यांनी नमूद केली. गुरुवारी उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये ते म्हणाले, विंग कमांडर व्योमिका सिंग ही हरियाणाची जाटव आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये कारवाई करणारे एअर मार्शल अवधेश कुमार भारती यादव हे आहेत. एक मुस्लिम, दुसरा जाटव आणि तिसरा यादव. हे युद्ध फक्त पीडीए (मागासवर्गीय, दलित, अल्पसंख्याक) नेच लढले. भाजप कोणत्या आधारावर श्रेय घेत आहे?
मंत्र्यांना काढा, सोफियांच्या काकाची मागणी : कर्नल सोफियांचे काका आणि चुलत भाऊ यांनी पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांकडे मंत्री शाह यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.