१३ हॉटेल, साधूचा वेष अन्... अत्याचारानंतर फरार झालेल्या चैतन्यनंदला अशी मदत करत होते शिष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 16:26 IST2025-09-29T16:24:24+5:302025-09-29T16:26:57+5:30
आश्रमातील मुलींवर अत्याचार करुन फरार झालेल्या चैतन्यनंद सरस्वती उर्फ पार्थ सारथी याला पोलिसांनी अटक केली.

१३ हॉटेल, साधूचा वेष अन्... अत्याचारानंतर फरार झालेल्या चैतन्यनंदला अशी मदत करत होते शिष्य
Baba Chaitanyanand: चैतन्यनंद सरस्वती उर्फ पार्थ सारथी याला पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीतील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट मधील १७ विद्यार्थिनींनी त्याच्यावर लैंगिक छळाचा आरोप केल्यापासून तो फरार होता. रविवारी, २८ सप्टेंबर रोजी दिल्लीपोलिसांनी त्याला उत्तर प्रदेशातील आग्रा येथून अटक केली. पीडित मुलींनी तक्रार दिल्यानंतर चैतन्यनंदचे कारनामे समोर आले. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. अखेर पोलिसांनी स्वयंघोषित बाबाला बेड्या ठोकल्या आहेत.
दिल्लीतील वसंत कुंज येथील आश्रमाचा संचालक चैतन्यनंद सरस्वती मोठ्या प्रमाणात मुलींचा विनयभंग आणि लैंगिक छळ केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. चैतन्यनंद सरस्वतीवर एक-दोन नव्हे तर ३५ हून अधिक विद्यार्थिनी आणि महिलांनी विनयभंगाचे आरोप केले आहेत. हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी चैतन्यनंदला अटक केली आहे. न्यायालयात हजर झाल्यानंतर बाबा चैतन्यनंदला वसंत कुंज उत्तर पोलीस ठाण्यात नेण्यात आले, जिथे त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
पोलिस दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान बाबा चैतन्यनंद अजिबात सहकार्य करत नाहीये. संध्याकाळी पोलीस ठाण्यात आल्यानंतर चैतन्यनंदने फळे आणि जेवणाची मागणी केली. त्याला जेवणासाठी फळे आणि नंतर पाणी देण्यात आले. दिल्ली पोलिसांचे पोलिस उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त आणि इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्यांनी चैतन्यनंद याची सुमारे दोन तास चौकशी केली. पण चैतन्यनंदन सहकार्य करायला तयार नाही. त्याने वारंवार पोलिसांना सांगितले की त्याच्यावरील आरोप निराधार आहेत.
अटकेनंतर चैतन्यनंदला पोलिस स्टेशनच्या लॉकअपमध्ये नेण्यात आले आहे, जिथे सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवले जात आहे. लॉकअपमध्ये त्यांच्यासाठी एक चादर आणि एक ब्लँकेट ठेवण्यात आले आहे. चैतन्यनंद याच्या सुरक्षेसाठी २४ तास दोन पोलिस कर्मचारी तैनात असतील. तपासादरम्यान, चैतन्यनंद फरार असतानाही संस्थेच्या कारवायांवर लक्ष ठेवून होता. फरार असताना, चैतन्यनंद स्वस्त हॉटेल्समध्ये, सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या हॉटेल्समध्ये राहत होता. चैतन्यनंदांचे शिष्य हॉटेल बुकिंग करत होते. पोलीस आता चैतन्यनंदच्या साथीदारांबद्दल माहिती गोळा करत आहेत. चैतन्यनंदने गेल्या ४० दिवसांत १३ हॉटेल बदलली आहेत, बहुतेक वेळा साधूच्या वेशामध्ये लपून बसला होता.