भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 16:13 IST2025-05-13T16:13:34+5:302025-05-13T16:13:49+5:30
PM Modi Visit Adampur Airbase: आदमपूर एअरबेसवरील S-400 हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केल्याचा पाकिस्तानचा दावा अखेर खोटा ठरला.

भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
PM Modi Visit Adampur Airbase: भारतीय सैन्याच्या "ऑपरेशन सिंदूर'च्या भव्य यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज(13 मे 2025) सकाळी अचानक पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर पोहोचले आणि त्यांनी भारतीय हवाई दलातील अधिकारी आणि सैनिकांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीदरम्यान सैनिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. यावेळी पीएम मोदींनी सैनिकांसोबत मनसोक्त गप्पा मारल्या.
पंतप्रधान मोदींकडून पाकिस्तानच्या 'त्या' दाव्याची पोलखोल
पंतप्रधान मोदी अशा वेळी आदमपूर एअरबेसवर पोहोचले, जेव्हा पाकिस्तान जगभरात सतत खोटी माहिती पसरवत आहे. पाकिस्तान सातत्याने आदमपूर एअरबेसवर हल्ला करून त्याचे मोठे नुकसान केल्याचा दावा करत होता. पण, पंतप्रधान मोदी स्वतः आदमपूर एअरबेसवर पोहोचल्यामुळे पाकिस्तानचा खोटेपणा जगासमोर उघड झाला.
Sharing some more glimpses from my visit to AFS Adampur. pic.twitter.com/G9NmoAZvTR
— Narendra Modi (@narendramodi) May 13, 2025
एस-400 हवाई संरक्षण प्रणाली सुरक्षित
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांवर ड्रोन हल्ले केले, त्याला भारतीय सैन्याने परतून लावले. पण, यानंतर पाकिस्तान सरकारने सतत याबाबत खोटा प्रचार करत होता. आदमपूर एअरबेस उडवल्याचे पाकिस्तान सरकार आणि माध्यमांमधून सांगितले जाऊ लागले. पाकिस्तानने आदमपूरमधील एस-400 हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केल्याचा दावाही केला होता. पण, आता आज पंतप्रधान मोदींनी या एअरबेसवर जाऊन S-400 हवाई संरक्षण प्रणालीसोबत फोटो शेअर केला.
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर या दौऱ्याचे अनेक फोटो शेअर केले आहेत. यामध्ये आदमपूर एअरबेस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे आणि पाकिस्तानचा दावा पूर्णपणे खोटा आणि निराधार असल्याचे सिद्ध झाले आहे. दरम्यान, या फोटोपैकी एका फोटोमध्ये पंतप्रधान मोदींच्या पाठीमागे S-400 हवाई संरक्षण प्रणालीदेखील दिसत आहे. यावरुनच हा एअरबेस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सिद्द होते.