पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 13:59 IST2025-06-18T13:59:09+5:302025-06-18T13:59:51+5:30

PM Modi Trump Phone Call: 'राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्वतः १४ वेळा दावा केला आहे की, त्यांच्या मध्यस्थीमुळे भारत-पाक युद्ध थांबले.'

PM Modi Trump Phone Call: Prime Minister Modi sat silent for 37 days and now..; Congress targets Modi-Trump talks | पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा

PM Modi Trump Phone Call: पंतप्रधान नरेंद्र मोदी G7 बैठकीसाठी कॅनडाच्या दौऱ्यावर गेले होते. जगातील अनेक मोठे नेतेही या बैठकीला उपस्थित होते. काही कारणास्तव डोनाल्ड ट्रम्प कॅनडाहून थोडे लवकर निघून गेले, त्यामुळे त्यांची पीएम मोदींशी भेट झाली नाही. पण, ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवर चर्चा केली. ३५ मिनिटे चाललेल्या या चर्चेत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. आता काँग्रेसने यावरुन केंद्र सरकार आणि पंतप्रधानांवर टीका केली आहे.

काँग्रेसचे तिखट प्रश्न...
'काँग्रेस नेते जयराम मीडियाशी संवाद साधताना म्हणाले की, पाकिस्तानी फील्ड मार्शल असीम मुनीरला आज व्हाईट हाऊसकडून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत जेवणाचे आमंत्रण मिळाले आहे. असीम मुनीरने जनरल असताना प्रक्षोभक विधान केले, त्यानंतर पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. आता त्याच असीम मुनीरला व्हाईट हाऊसमध्ये जेवणाचे आमंत्रण देणे, हे आपल्या राजनयिकतेसाठी आणि पंतप्रधान मोदींसाठी एक मोठा धक्का आहे.'

जयराम रमेश पुढे म्हणतात, 'राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः १४ वेळा दावा केला आहे की, त्यांच्या मध्यस्थीमुळे भारत-पाक युद्ध थांबले. पंतप्रधान मोदी ३७ दिवस या दाव्यावर काहीही बोलले नाही, आता आज परराष्ट्र सचिवांनी म्हटले की, पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी ३५ मिनिटे फोनवर चर्चा केली. आम्ही म्हणतो की, परराष्ट्र सचिवांनी ज्या गोष्टींचा उल्लेख केला, तीच गोष्ट पंतप्रधान मोदी स्वतः सर्वपक्षीय बैठकीत का बोलत नाहीत? संसदेच्या विशेष अधिवेशनात पंतप्रधान मोदींनी तीच गोष्ट सांगावी, अशी आमची इच्छा आहे.

'पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा झाली, हे चांगले आहे. आता भारतात परतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठक घेऊन विरोधी पक्षांच्या नेत्यांना या संभाषणाची माहिती द्यावी. परंतु आमचा प्रश्न असा आहे की, पंतप्रधान मोदी चर्चेपासून का पळून जात आहेत? या चर्चेबद्दल ट्रम्प काय म्हणतात, हे पाहणे बाकी आहे. तोपर्यंत परराष्ट्र सचिवांनी जे म्हटले, ते आम्ही स्वीकारतो,' असे जयराम रमेश यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. 

मोदींनी स्वतः सांगावे...
शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले की, 'पंतप्रधान मोदींनी स्वतः ट्रम्प यांच्याशी काय चर्चा केली, ते सांगावे. दुसरे कोणी का बोलत आहेत?' दरम्यान, भारताने कधीही मध्यस्थी स्वीकारली नाही आणि कधीही करणार नाही, या पंतप्रधान मोदींच्या विधानावर सीपीआयचे सरचिटणीस डी राजा म्हणाले की, पंतप्रधान म्हणून, 'मोदींनी देशाला खरोखर काय घडले ते सांगावे. संसद, राजकीय पक्ष आणि भारतातील लोकांना विश्वासात का घेतले जात नाही?' असा प्रश्न त्यांनी विचारला.

मोदी-ट्रम्प यांच्यात ३५ मिनिटांची चर्चा
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितल्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या ३५ मिनिटांच्या चर्चेत अनेक विषयांवर चर्चा झाली. यादरम्यान, दोन्ही नेत्यांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्राबाबत आपले विचार मांडले. या प्रदेशात क्वाडच्या महत्त्वाच्या भूमिकेला दोघांनीही पाठिंबा दर्शवला. तसेच, पंतप्रधान मोदींनी क्वाडच्या पुढील बैठकीसाठी ट्रम्प यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले. 

Web Title: PM Modi Trump Phone Call: Prime Minister Modi sat silent for 37 days and now..; Congress targets Modi-Trump talks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.