पंतप्रधान मोदींच्या जनसेवेचे यशस्वी ८,९३१ दिवस, २४ वर्षांत सुट्टी नाही; अमित शाहंकडून गौरव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 07:33 IST2026-03-23T07:33:47+5:302026-03-23T07:33:47+5:30
अभूतपूर्व विश्वास आणि अद्वितीय सेवेतून घडलेली दुर्मीळ परंपरा-प्रधानसेवक मोदी.

पंतप्रधान मोदींच्या जनसेवेचे यशस्वी ८,९३१ दिवस, २४ वर्षांत सुट्टी नाही; अमित शाहंकडून गौरव
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील विक्रमी ८,९३१ दिवसांची प्रशंसा करत हा टप्पा सेवा, कठोर परिश्रम आणि अतूट बांधिलकीवर आधारित असल्याचे म्हटले आहे.
प्रथम गुजरातचे मुख्यमंत्री व नंतर देशाचे पंतप्रधान म्हणून मोदी यांनी सार्वजनिक जीवनात विक्रमी ८,९३१ दिवस पूर्ण करून ‘राष्ट्र प्रथम’ या तत्त्वाप्रती असलेली त्यांची बांधिलकी, सुशासन, कामातील प्रामाणिकपणा व प्रत्येक नागरिकाच्या अथक सेवेला दिलेले प्राधान्य स्पष्ट होते.
शाह यांनी ‘एक्स’वरील संदेशात म्हटले की, मोदी हे रविवारी सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांच्या ८,९३० दिवसांच्या विक्रमाला मागे टाकत भारतात सर्वाधिक काळ सरकारप्रमुख म्हणून काम करणारे व्यक्ती ठरले. मोदींच्या दशकांच्या सेवेमुळे एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदी युगाने भारतात आमूलाग्र बदल घडवला आहे.
असा आहे प्रवास
नरेंद्र मोदी यांनी ७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. ते २१ मे २०१४ पर्यंत या पदावर कार्यरत होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला २८२ जागांसह मोठा विजय मिळवून दिल्यानंतर मोदी यांनी २६ मे रोजी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यावेळी भाजप हा स्पष्ट बहुमत मिळवणारा पहिला गैर-काँग्रेस पक्ष ठरला, तर काँग्रेसला ४४ जागांवर समाधान मानावे लागले होते.
पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे
अमित शाह म्हणाले की, २४ वर्षांहून अधिक काळ सुट्टी न घेता राष्ट्र आणि जनतेची सेवा करणे ही त्यांच्या अतूट बांधिलकीची साक्ष आहे. त्यामुळेच गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून तीन वेळा आणि भारताचे पंतप्रधान म्हणून तीन वेळा त्यांना जनतेकडून अभूतपूर्व प्रेम मिळाले.
जनतेचा विश्वास, स्नेह आणि पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे. हे यश सेवा, कठोर परिश्रम आणि अतूट बांधिलकीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे संबोधत शाह यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, अभूतपूर्व विश्वास आणि अद्वितीय सेवेतून घडलेली दुर्मीळ परंपरा-प्रधानसेवक मोदी.