'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 20:11 IST2025-08-25T20:10:44+5:302025-08-25T20:11:27+5:30
PM Modi on Trump Tariff: 'देशातील शेतकरी आणि पशुपालकांचे हित आमच्यासाठी सर्वात महत्वाचे आहे.'

'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
PM Modi on Trump Tariff: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील खोडलधाम मैदानावर ५,४०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी डोनाल्ड ट्रम्पच्या शुल्कावरील मोठे विधान केले. ते म्हणाले की, कितीही दबाव टाकला तरी, आम्ही आमची ताकत वाढवण्याचे काम करत राहू.
पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले की, देशातील शेतकरी आणि पशुपालकांचे हित सरकारसाठी सर्वोपरी आहे. मी माझ्या लहान उद्योजकांना, लहान दुकानदारांना, शेतकरी, पशुपालकांना सांगू इच्छितो की, आमच्यासाठी देशातील लहान उद्योजक, शेतकरी आणि पशुपालक महत्वाचे आहेत. आम्ही कधीही तुमचे नुकसान होऊ देणार नाही. कितीही दबाव आला तरी आम्ही शक्ती वाढवत राहू.
LIVE: PM Shri @narendramodi lays foundation stone, inaugurates development works in Ahmedabad, Gujarat. https://t.co/ot3XYAISy5
— BJP (@BJP4India) August 25, 2025
यावेळी पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेला भारतात बनवलेल्या वस्तूंना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, सजावटीच्या वस्तू असोत किंवा भेटवस्तू असोत, आपण आपल्या देशात बनवलेल्या वस्तू खरेदी केल्या पाहिजेत. पंतप्रधानांनी व्यावसायिकांना परदेशी वस्तूंची विक्री टाळण्याचे आवाहन केले आहे. आमचे सरकार जीएसटीमध्ये सुधारणा करत आहे, दिवाळीपूर्वी तुम्हाला एक मोठी भेट मिळेल. जीएसटी सुधारणांमुळे लघु उद्योगांना खूप मदत होईल, अनेक गोष्टींवरील कर कमी होतील. या दिवाळीत सर्वांना आनंदाचा दुहेरी बोनस मिळणार आहे, असेही मोदींनी यावेळी सांगितले.
ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, संपूर्ण जगाने पाहिले की, भारताने पहलगामचा बदला कसा घेतला. फक्त २२ मिनिटांत दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले. ऑपरेशन सिंदूर हे आपल्या सैन्याच्या शौर्याचे आणि भारताच्या इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणतात, गेल्या अनेक वर्षांपासून गांधीजींच्या नावाने राजकारण करणाऱ्यां तोंडून स्वच्छता किंवा स्वदेशी हा शब्द एकदाही ऐकला नाही. ६०-६५ वर्षे देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेसने भारताला इतर देशांवर अवलंबून ठेवले, जेणेकरून ते घोटाळे करू शकतील. पण आज भारताने आत्मनिर्भरतेला विकसित भारताचा आधार बनवले आहे.