राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 17:08 IST2025-11-16T17:07:48+5:302025-11-16T17:08:10+5:30
PM Modi on Congress: आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती चिंताजनक असल्याचे पीएम मोदी म्हणाले.

राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
PM Modi on Congress: बिहार विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर, एनडीएमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. एकीकडे दिल्लीमध्ये अमित शाहांच्या नेतृत्वात बैठकांचे सत्र सुरू आहे, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीकाँग्रेसवर बोचरी टीका केली आहे. गुजरात दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी आरोप केला की, काँग्रेस पक्ष संसदेत आपल्या तरुण खासदारांना बोलू देत नाही आणि त्यामुळे त्यांचा राजकीय प्रवास धोक्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी मोदींनी काँग्रेसला मुस्लिम लीगी माओवादी पार्टी असेही म्हटले होते.
काँग्रेसमधील अंतर्गत वादावर पंतप्रधानांचा निशाणा
सुरत येथील कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसवाले संसदेत गोंदळ घालतात, सभात्याग करतात, त्यामुळे त्यांचे तरुण खासदार आपली मते मांडू शकत नाहीत. काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीतील तरुण खासदार आम्हाला सांगतात की, आम्हाला बोलण्याची संधीच मिळत नाही. आम्हाला आमच्या मतदारसंघातील मुद्दे संसदेत मांडू उपस्थित करता येत नसल्याने, करिअर धोक्यात आले आहे. काही खासदार तर सांगतात की, आम्हाला मतदारांना उत्तर देणेही अवघड होत आहे. आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती चिंताजनक आहे.
Speaking in Surat. Watch. https://t.co/chw5JEn0Kj
— Narendra Modi (@narendramodi) November 15, 2025
जॉन ब्रिटास यांच्या विधानाचाही उल्लेख
सीपीआय (एम) चे राज्यसभा सदस्य जॉन ब्रिटास यांनीही यापूर्वी संसदेत होणाऱ्या व्यत्ययांबाबत नाराजी व्यक्त केली होती. एका पॉडकास्टमध्ये त्यांनी दावा केला होता की, त्यांनी राहुल गांधींना संसद रोज ठप्प करू नये असे सांगितले होते. त्यांना केरळशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करायचे होते. मात्र, राहुल गांधींनी त्यांचा प्रस्ताव नाकारला. मोदी पुढे म्हणतात, ही मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस आता देश स्वीकारणार नाही. काँग्रेसमधील राष्ट्रीय विचारांचे अनेक नेते ‘नामदार’च्या(राहुल गांधी) वागणुकीने त्रस्त आहेत. काँग्रेस अशा अवस्थेत पोहोचली आहे की, तिला आता कोणी वाचवू शकत नाही, अशी घणाघाती टीकाही पीएम मोदींनी केली.