दहशतवादावर पीएम मोदींचा प्रहार; 21 जून रोजी पंतप्रधान थेट जम्मू-काश्मीरला जाणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 20:51 IST2024-06-13T20:50:53+5:302024-06-13T20:51:23+5:30
International Yoga Day : नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदींचा हा दौरा महत्वाचा आहे.

दहशतवादावर पीएम मोदींचा प्रहार; 21 जून रोजी पंतप्रधान थेट जम्मू-काश्मीरला जाणार...
PM Modi Jammu Kashmir Visit : दहशतवादाने ग्रासलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. सध्या राज्यात सर्वत्र सैन्याच्या शोध मोहिमा सुरू असून, चार दहशतवाद्यी ठार झाले आहेत. अशातच, तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी येत्या 20 जून रोजी जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 21 जून रोजी राज्यात होणाऱ्या योग दिनाच्या कार्यक्रमात मोदी सहभागी होतील.
यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस, योग महोत्सव 2024 म्हणून साजरा केला जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान मोदी 20 जून रोजी काश्मीरला पोहोचतील आणि तिथे रात्री मुक्काम करतील. दुसऱ्या दिवशी सकाळी एका योग कार्यक्रमात ते सहभागी होतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाची जागा अद्याप निश्चित झाली नसले तरी, हा कार्यक्रम श्रीनगरमधील दल सरोवर आणि झाबरवान टेकड्या परिसरात आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. अशा वातावरणात मोदींनी जम्मू-काश्मीरला जाणे, दहशतवाद्यांसाठी थेट इशारा असेल.
काश्मीरमध्ये पर्यटन वाढवण्यावर जोर
या आयोजनाद्वारे काश्मीरमधील पर्यटन वाढवण्यावर जोर दिला जाणार आहे. पंतप्रधान मोदी स्वतः योग करतात, ज्यामुळे जगभरातील लाखो-करोडो लोकांना एकत्र केले आहे. योग महोत्सव 2024 चे उद्दिष्ट योगाचे एका व्यापक चळवळीत रूपांतर करणे आहे, ज्यामध्ये महिलांचे कल्याण आणि जागतिक आरोग्य आणि शांततेवर विशेष भर दिला जाईल. महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे, हा यंदाच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
जम्मू-काश्मीर प्रशासन हाय अलर्टवर
लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील जम्मू-काश्मीर प्रशासनाला पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याबाबत हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. याचबरोबर जम्मू-काश्मीर स्पोर्ट्स काउंसिलला योग दिनाच्या कार्यक्रमाच्या व्यवस्थेवर देखरेख ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षा पथके नियमितपणे आयोजनस्थळी दौरे करतील.