वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान मोदींचा हिरवा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 20:11 IST2019-02-15T20:07:57+5:302019-02-15T20:11:01+5:30

वाराणसी ते दिल्ली अंतर आता अवघ्या 8 तासात कापणं शक्य

PM Modi inaugurates Vande Bharat Express Indias fastest train | वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान मोदींचा हिरवा झेंडा

वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान मोदींचा हिरवा झेंडा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशाची पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. ही ट्रेन दिल्ली ते वारासणी हे अंतर 8 तासांमध्ये कापेल. या दरम्यान ट्रेन विशेष कार्यक्रमांसाठी कानपूर आणि प्रयागराजला प्रत्येकी 40 मिनिटं थांबेल. या ट्रेनचं नाव आधी ट्रेन 18 असं होतं. त्यानंतर ते वंदे भारत करण्यात आलं. ही ट्रेन ताशी १८० ते २०० किलोमीटर वेगाने धावू शकते. यामध्ये शताब्दी ट्रेन्सपेक्षा उत्तम सोयी सुविधा आहेत. 17 फेब्रुवारीपासून ही ट्रेन सर्वसामान्यांसाठी खुली होईल.

वंदे भारत ट्रेनला 16 वातानुकूलित डबे आहेत. यापैकी 14 डबे चेअर कार आहेत, तर दोन डबे एक्झिक्युटिव्ह श्रेणीतले आहेत. त्यापैकी चेअर कारचं तिकीट 1760 रुपये निश्चित करण्यात आलं असून, एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी 3310 रुपये मोजावे लागतील. 'वंदे भारत एक्सप्रेस'ने तुम्ही परतीचा प्रवासही करणार असाल, तर या प्रवासासाठी चेअर कारचं तिकीट 1700 रुपये असेल आणि एक्झिक्युटिव्ह क्लासचे 3260 रुपये होतील. या ट्रेनची क्षमता 1128 प्रवासी इतकी आहे. या दोन्ही तिकिटदरांमध्ये जेवणाची रक्कम समाविष्ट आहे. 

‘मेक इन इंडिया’च्या अंतर्गत या ट्रेनची निर्मिती करण्याती आली आहे. चेन्नईतल्या इंटिग्रल कोच फॅक्टरीत ही ट्रेन तयार करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी या ट्रेनचं नाव बदलण्याची आल्याची घोषणा केली. दिल्ली ते वाराणसी हे ७५५ किलोमीटरचं अंतर वंदे भारत एक्सप्रेस ८ तासांत पार करणार आहे. 

 

'ट्रेन 18'ची १८ वैशिष्ट्यं

- 'मेक इन इंडिया' योजनेचा हिस्सा असलेली भारतातली ही पहिली इंजिनलेस रेल्वे आहे.

- चाचणीदरम्यान या रेल्वेनं ताशी १८० किलोमीटरचा वेग पार केला असून, ती ताशी दोनशे किलोमीटर या वेगानं पळू शकते.

- कितीही वेगानं धावली तरी प्रवाशानं भरून ठेवलेली पाण्याची बाटलीही कलंडणार नाही, इतकी या रेल्वेची स्थिरता असेल, असा दावा करण्यात आलाय.

- १६ डबे असलेली ही रेल्वे पूर्णत: वातानुकूलित आहे.

- या रेल्वेची रचना अशा पद्धतीनं करण्यात आली आहे, की प्रवाशांना थेट ड्रायव्हरची केबिनही दिसू शकेल.

- या रेल्वेला स्वयंचलित दरवाजे आणि स्लायडिंग फूटस्टेप्स असतील. प्रवाशांना वेगवान मोफत वायफाय आणि इन्फोटेनमेंट मिळेल.

- रेल्वेत झिरो डिस्सार्ज बायो व्हॅक्युम शौचालयं असतील.

- रेल्वेत एलइडी लाइट्स, मॉड्युलर टॉयलेट्स आणि 'अ‍ॅस्थेटिक टच फ्री बाथरूम्स' असतील, शिवाय अपंगांसाठीही मैत्रीपूर्ण सुविधा असेल.

- रेल्वेच्या दोन्ही टोकांना ड्रायव्हर केबिन्स असतील.

- जीपीएस प्रणालीद्वारे प्रत्येक प्रवाशाची माहिती रेल्वेला मिळू शकेल.

- प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे असतील.

- सर्व डबे एकमेकांशी संलग्न असतील.

- ऊर्जाबचतीसाठी रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली आहे.

- आणीबाणीच्या प्रसंगी चालक दलाशी थेट संपर्काची यंत्रणा रेल्वेत असेल.

- पहिल्या 'ट्रेन १८'मध्ये १६ चेअरकार डबे असतील. त्यातील १४ डबे 'नॉन एक्झिक्युटिव्ह' तर दोन डबे 'एक्झिक्युटिव्ह' असतील. प्रत्येक डब्यातील प्रवाशांची संख्या अनुक्रमे ७८ आणि ५६ असेल.

- 'एक्झिक्युटिव्ह' क्लासमधील आसनव्यवस्था फिरती असेल आणि रेल्वे ज्या दिशेनं जातेय, त्या दिशेनं आपलं आसन फिरवता येऊ शकेल.

- ही रेल्वे येत्या काळात 'शताब्दी एक्सप्रेस'ची जागा घेईल. सुरुवातीच्या टप्प्यात अशा नऊ रेल्वे देशात वेगवेगळ्या मार्गावर धावतील.

- ही रेल्वे बनवण्यासाठी शंभर कोटी रुपये खर्च आलेला आहे. आयात रेल्वेपेक्षा हा खर्च निम्म्यानं कमी आहे.
 

 

Web Title: PM Modi inaugurates Vande Bharat Express Indias fastest train