'मुंबईतील बैठकीत योजना, मग सनातनचा अपमान...', भाजपचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 01:55 PM2023-09-12T13:55:44+5:302023-09-12T13:56:11+5:30

सनातन धर्माबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या मुद्द्यावरुन भाजप नेते आक्रमक झाले आहेत.

'Plan in meeting in Mumbai, then insult Sanatan...', BJP's attack on India Aghadi | 'मुंबईतील बैठकीत योजना, मग सनातनचा अपमान...', भाजपचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल

'मुंबईतील बैठकीत योजना, मग सनातनचा अपमान...', भाजपचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल

googlenewsNext

नवी दिल्ली: सनातन धर्माच्या अपमानाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. या मुद्द्यावरुन भाजप काँग्रेस आणि 'इंडिया' आघाडीवर निशाण साधत आहे. एवढंच नाही तर मुंबईतील 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत रणनीती आखल्यानंतर विरोधी नेत्यांचे सनातनविरोधात वक्तव्य आल्याचा आरोप भाजपने केला आहे. 

भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्विट करुन सोनिया आणि राहुल गांधी यांना यावर खुलासा करण्यास सांगितले आहे. भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांनीही सनातन धर्माला बदनाम करण्यासाठी इंडिया आघाडी स्थापन करण्यात आल्याचा आरोप केला. या मुद्द्यावर सोनिया गांधी, लालू प्रसाद यादव आणि अखिलेश यादव यांच्या मौनावरही रविशंकर यांनी प्रश्न उपस्थित केला.

जेपी नड्डा यांनी ट्विट केले की, "I.N.D.I.A आघाडीच्या मुंबईतील बैठकीनंतर उदयनिधी स्टॅलिन यांचे वक्तव्य, त्यानंतर प्रियांक खर्गे यांचा सनातनवर हल्ला आणि आज द्रमुकच्या मंत्र्याने मान्य केले की, सनातन धर्माचा विरोध करण्यासाठी इंडिया आघाडी स्थापन केली आहे. सोनिया गांधी, राहुल आणि काँग्रेसने विचारपूर्वक आखलेली रणनीती आहे. "

"या विधानावर काँग्रेस आणि I.N.D.I.A ने आपले मत स्पष्ट करावे, त्यांनी सांगावे की, कोणत्याही धर्माबाबत आक्षेपार्ह विधान करण्याचा घटनेत अधिकार आहे का? I.N.D.I.A आघाडीच्या लोकांना संविधानातील तरतुदी माहित नाहीत का? I.N.D.I.A, काँग्रेस, सोनिया आणि राहुल यांनी सांगावे प्रेमाच्या दुकानाच्या नावाखाली सनातन धर्माच्या विरोधात द्वेषाचा माल का विकला जातोय? हा द्वेषाचा मेगा मॉल फक्त सत्तेसाठी आहे. फूट पाडा आणि राज्य करा," अशी टीका नड्डा यांनी केली.

सनातनचा अपमान करणे हा 'इंडिया'चा अजेंडा 
दरम्यान, रविशंकर प्रसाद म्हणाले, "अहंकारी आघाडीचे लोक सनातन धर्मावर प्रश्न विचारत आहेत. या मुद्द्यावर आम्ही सोनिया, राहुल आणि प्रियंका यांना प्रश्न विचारला. पण त्याच्याकडून काहीच उत्तर आले नाही. सनातनला विरोध करणे हा आघाडीचा अजेंडा आहे. इतर कोणत्याही धर्मावर बोलण्याची हिंमत काँग्रेसमध्ये आहे का? हे लोक व्होट बँकेसाठी सनातनवर बोलत आहेत. इतर धर्मांबाबत गप्प आहेत. काँग्रेसचा एकही मोठा नेता रामजन्मभूमीला भेट देण्यासाठी गेला नाही. आम्ही सोनिया गांधींना स्पष्टपणे सांगू इच्छितो की, भारत सनातनचा अपमान सहन करणार नाही. हिंदू धर्माचा अपमान सहन करणार नाही", अशी टीका रविशंकर प्रसाद यांनी केली. 

 

Web Title: 'Plan in meeting in Mumbai, then insult Sanatan...', BJP's attack on India Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.