न्यायाधीशांच्या घरात ढीगभर कॅश? सुप्रीम कोर्ट करणार अंतर्गत चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 07:54 IST2025-03-22T07:53:02+5:302025-03-22T07:54:18+5:30

दिल्ली हायकोर्ट न्यायाधीशांच्या घरात आग लागल्यानंतर कोट्यवधींच्या नोटा आढळल्याची चर्चा; अग्निशमन दल म्हणते, जवानांना कोणतीही कॅश मिळाली नव्हती; राज्यसभेतही मुद्दा गाजला

Piles of cash in judge's house? Supreme Court to conduct internal inquiry | न्यायाधीशांच्या घरात ढीगभर कॅश? सुप्रीम कोर्ट करणार अंतर्गत चौकशी

न्यायाधीशांच्या घरात ढीगभर कॅश? सुप्रीम कोर्ट करणार अंतर्गत चौकशी

नवी दिल्ली : दिल्लीउच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या शासकीय निवासस्थानी आग लागल्याचे निमित्त झाले आणि आग विझविताना घरात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडल्याने न्यायपालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रचंड तापला. यामुळे देशभर खळबळ उडाली असून, सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालील कॉलेजियमने न्या. वर्मा यांची तत्काळ अलाहाबादला बदली केली आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत. अग्निशमन दलाने मात्र कोणतीही कॅश मिळली नसल्याचा दावा केला आहे. 

सरन्यायाधीश खन्ना यांनी कॉलेजियमची बैठक बोलावून न्या. वर्मा यांची पुन्हा अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्याचे आदेश काढले. परंतु, कॉलेजियमचे सदस्य केवळ एवढ्या कारवाईवर संतुष्ट नाहीत. या प्रकरणी न्या. वर्मा यांचा राजीनामा मागितला जावा, असे या सदस्यांचे मत आहे. याप्रकरणी राज्यसभेतही विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला. 

राजीनामा मागा, कॉलेजियम कठोर 
कॉलेजियमच्या सदस्यांनुसार केवळ बदलीवर हे प्रकरण निपटले तर न्यायपालिकेची प्रतिमा मलिन होईल. यावर गंभीर कारवाई झाली नाही तर न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी होईल. 

या प्रकरणी न्या. वर्मा यांचा तातडीने राजीनामा मागितला पाहिजे, अशी सदस्यांची भावना. न्या. वर्मा यांनी राजीनामा दिला नाही तर संसदेच्या माध्यमातून त्यांची हकालपट्टी करण्याची प्रक्रिया सुरू करायला हवी 

चुकीची माहिती आणि अफवा 
सर्वोच्च न्यायालयाने निवेदन जारी करत म्हटले की, "न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी घडलेल्या घटनेबाबत चुकीची माहिती आणि अफवा पसरवल्या जात आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय यांनी चौकशी सुरू केली, ते सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना अहवाल सादर करणार आहेत. 

१४ मार्च रोजी नेमके काय घडले? 
१४ मार्च रोजी दिल्लीतील निवासस्थानी आग लागली तेव्हा न्या. वर्मा शहराबाहेर होते. कुटुंबीयांनी आगीची माहिती अग्निशामक दल आणि पोलिसांना दिली. आग विझविताना अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना एका खोलीत रोख रकमेचा मोठा साठा सापडला. 

नेमकी रक्कम किती आहे, हे अजून निश्चित नसले तरी नोटांची ही बंडले पाहून सारेच हादरले. ही माहिती तत्काळ पोलिस आणि सरन्यायाधीशांना देण्यात आली. नंतर मात्र, दिल्ली अग्निशमन दलाचे प्रमुख अतुल गर्ग यांनी म्हटले की, आग विझविताना न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात कॅश मिळाली नाही. 

आग लागलेल्या स्टोअर रुममध्ये स्टेशनरी साहित्य व घरगुती सामान होते. १५ मिनिटांत आग आटोक्यात आणली आणि कर्मचारी निघून गेले. तेथे रोख रक्कम वगैरे सापडलेली नाही, असे गर्ग यांनी स्पष्ट केले. 

गर्ग यांनी म्हटले आहे की, आग आटोक्यात आणल्यानंतर या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना कळविण्यात आली आणि त्यानंतर अग्निशामक दलाचे पथक तेथून रवाना झाले. 

Web Title: Piles of cash in judge's house? Supreme Court to conduct internal inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.