राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 07:31 IST2025-05-11T07:29:11+5:302025-05-11T07:31:06+5:30
शुक्रवारी रात्री कच्छ भागात ड्रोनहल्ले करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला होता. तो भारतीय लष्कराने हाणून पाडला.

राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
भुजः भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गुजरातच्या कच्छमधील प्रशासनाने नागरिकांना घरातच राहण्याचा व गरज नसताना घराबाहेर न पडण्याचा सल्ला शनिवारी जारी केला. शुक्रवारी रात्री कच्छ भागात ड्रोनहल्ले करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला होता. तो भारतीय लष्कराने हाणून पाडला. त्यानंतर कच्छसह अन्य २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट करण्यात आले. प्रशासनाने हा सल्ला जारी केला.
पाकिस्तानने ड्रोनहल्ल्यांचा मारा केल्यामुळे राजस्थानच्या सीमावर्ती भागात नागरिकांनी २ रात्री जागून काढल्या. भारतीय लष्कराने पाकचे बहुतांश ड्रोन हवेतच निकामी केल्यामुळे लोकांचा लष्करावरील विश्वास द्विगुणित झाला. पश्चिम राजस्थानमध्ये शुक्रवारी रात्री संपूर्ण ब्लॅकआउट करण्यात आले.
भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर गरज पडल्यास युद्धासाठी कर्तव्यावर परत जाण्यासाठी सज्ज असल्याचा दावा हवाई दलातील माजी पायलट व तेलंगाणाचे मंत्री एन. उत्तम कुमार रेड्डी यांनी केला. हैदराबाद येथील गांधी भवनात माध्यमांशी संवाद साधताना स्वतःची लष्करी पार्श्वभूमीही त्यांनी स्पष्ट केली.
दिल्ली विमानतळ, वाहतूक सुरळीत
दिल्ली विमानतळावरील वाहतूक सुरुळीत आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हवाई क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीमुळे काही उड्डाणांवर परिणाम होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. मात्र, सायंकाळी दोन्ही देशांमध्ये शस्रसंधी झाल्यामुळे संपूर्ण हवाई वाहतूक पूर्ववत होण्याची चिन्हे दिसत आहेत. दोन्ही देशातील संघर्ष वाढल्यामुळे देशभरातील विमानतळावर कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात केला होता. राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामकाज पाहणाऱ्या दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (डायल) संस्थेने एक्स या सोशल माध्यमाद्वारे दिली.