चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 16:16 IST2025-07-08T16:16:11+5:302025-07-08T16:16:37+5:30
Crime News: एका व्यावसायिकाकडून तब्बल ७५ लाख रुपयांचे मौल्यवान दागदागिने आणि सोने लुटणाऱ्या दरोडेखोरांनाच एका ठकसेनाने गंडा घातल्याची अजब घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दरोडेखोरांसह हे दागिने खरेदी करणाऱ्या ज्वेरलनाही अटक केली आहे.

चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
जयपूरमधील एका व्यावसायिकाकडून तब्बल ७५ लाख रुपयांचे मौल्यवान दागदागिने आणि सोने लुटणाऱ्या दरोडेखोरांनाच एका ठकसेनाने गंडा घातल्याची अजब घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दरोडेखोरांसह हे दागिने खरेदी करणाऱ्या ज्वेरलनाही अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार जयपूर येथील व्यावसायिकाकडील मौल्यवान रत्ने आणि दागिने लुटून जेव्हा काही दरोडेखोर ते विकण्यासाठी मुंबईत आले. तेव्हा हे दागिने खरेदी करणाऱ्या व्यक्तीने सदर दागिने खोटे असल्याचे सांगत या दरोडेखोरांची केवळ १ लाख रुपये देऊन बोळवण केली. सुरुवातीला मिळालेले लाखभर रुपये घेऊन हे दरोडेखोर समाधानी झाले. मात्र त्याने आपल्याला गंडा घातलाय हे समजताच त्यांना धक्का बसला. या चोरी प्रकरणी जेव्हा पोलिसांनी तीन दरोडेखोरांना अटक केली तेव्हा त्यांनी एका व्यक्तीने चोरीचे दागिने खरेदी करताना आपल्यालाच गंडा घातल्याची माहिती दिली. त्यावनंतर पोलिसांनी कारवाई करत अजय कुमार नट नावाच्या ज्वेलरला मुंबईतून अटक केली.
सदर दरोडेखोरांनी जयपूरमधील जौहरी बाजार येथील ज्वेलरी व्यापारी बृजमोहन गांधी हे कारने जात असताना एका चौकात दुचाकीवरू आलेल्या दोन दरोडेखोरांनी त्यांच्या कारमधील मौल्यवान दागदागिन्यांची पिशवी कारची काच फोडून लंपास केली होती. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाईला सुरुवात केली. तसेच दरोडेखोरांचा छडा लावण्यासाठी सीसीटीव्ही तपासले असता एका चित्रफितीमध्ये महाराष्ट्रातील क्रमांक असलेली एक स्कूडी दिसली. त्यावरून पोलिसांनी तपासाची सूत्रे पुढे नेली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशनच्या आधारावर भरतपूरमधील अनीपूर येथून धर्मवीर उर्फ राहुल जाट याला अटक केली. सुरुवातीला त्याने गुन्हा कबूल केला नाही. मात्र सीसीटीव्ही चित्रफीत दाखवल्यावर तो कबूल झाला. तसेच त्याने पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये इतर आरोपींचीही नावंही सांगितली.
या दरोडेखोरांनी सदर लुटीचा माल मुंबईतील अजयकुमान नट नावाच्या व्यक्तीला विकला. मात्र अजय कुमार नट याने सदर दरोडेखोरांकडील मौल्यवान रत्ने आणि दागदागिने खरे नसल्याचे सांगत त्यांना केवळ लाखभर रुपये दिले. किमान एवढी तरी रक्कम मिळाली म्हणून हे दरोडेखोर आनंदित झाले. मात्र जेव्हा सदर चोरीची वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली बातमी आणि चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत ऐकली तेव्हा त्यांना धक्का बसला.
दरम्यान, पोलिसांनी जेव्हा या प्रकरणी तीन आरोपींना जयपूर येथून अटक केली तेव्हा त्यांनी आपली फसवणूक करणाऱ्या अजय नट यालाही धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. तसेच त्याच्याबाबत माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी अजय नट याचा शोध घेऊन त्याला आणि त्याच्या मुंबईजवळील एका ठिकाणाहून ताब्यात घेतले.