Patriotic Muslims will vote in favour of BJP - KS Eshwarappa | देशभक्त मुस्लिम भाजपाला मत देतील आणि पाकिस्तानधार्जिणे कचरतील, भाजपा नेते बरळले

देशभक्त मुस्लिम भाजपाला मत देतील आणि पाकिस्तानधार्जिणे कचरतील, भाजपा नेते बरळले

बंगळुरू - काहीतरी वादग्रस्त वक्तव्ये करून रोज नवनव्या वादांना तोंड फोडणारे नेते भाजपामध्ये कमी नाहीत. आता भाजपाच्याकर्नाटकमधील एका नेत्याने मुस्लिमांच्या देशभक्तीवरून वक्तव्य करून वाद ओढवून घेतला आहे. ''देशभक्त मुस्लिम हे भाजपाला मतदान करतील, तर जे पाकिस्तानचे समर्थन करतात, असे मुस्लिम भाजपाला मत देण्यास कचरतील,''असे वक्तव्य कर्नाटक सराकरमधील पंचायती राज मंत्री आणि भाजपा नेते के. एस. ईश्वरप्पा यांनी केले आहे. 

रविवारी एका ठिकाणी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना  ईश्वरप्पा म्हणाले की, ''आता मी जे सांगत आहे ते प्रसारमाध्यमांनी लिहून घ्यावे, एक राष्ट्रभक्त मुस्लिम भाजपाला मत देईल. मात्र जे पाकिस्तान समर्थक आणि राष्ट्रद्रोही आहेत, असे मुस्लिम भाजपाला मत देण्यास कचरतील.'' दरम्यान, भाजपा मुस्लिम उमेदवारांना तिकीट देणार नाही कारण ते भाजपावर विश्वास ठेवत नाहीत, असा दावा ईश्वरप्पा यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान केला होता. कर्नाटकमधील भाजपा सरकार गोहत्येवर बंदी घालणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. दरम्यान, देशभक्त मुस्लिमांचा उल्लेख करताना ईश्वरप्पा यांनी आपल्या मतदारसंघाबाबत सांगितले. ''भाजपा सत्तेवर येण्यापूर्वी मी भाजपात प्रवेश करू इच्छिणाऱ्या काँग्रेसच्या काही आमदारांना भेटलो होतो. मात्र त्यांच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये ५० हजारहून अधिक मुस्लिम मतदार असून, त्यांना गमावल्यास आपला पराभव होईल, अशी भीती या आमदारांनी व्यक्त केली. त्यानंतर मी त्यांना माझ्या मतदारसंघाचे उदाहरण दिले. शिमोगा या माझ्या मतदारसंघात ५० हजारांहून अधिक मुस्लिम मतदार आहेत. मात्र मी कधीही त्यांच्याकडे मत मागण्यासाठी गेलो नाही. मी या काँग्रेस आमदारांना सांगितले की, माझ्या मतदारसंघात माझ्या कुरुबा जातीचे केवळ ८ ते १० हजार मतदार आहेत. तर मुस्लिम मतदार ५० हजारांहून अधिक आहेत. मात्र मी आतापर्यंत एकदाही एकाही मुस्लिमाला सलाम करायला गेलो नाही.  तहीही मी ४७ हजार मतांनी विजयी झालो.'' 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Patriotic Muslims will vote in favour of BJP - KS Eshwarappa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.