Karnataka Election Results: 'आणीबाणी लागू करणाऱ्यांनी आम्हाला घटनेच्या मर्यादा शिकवू नयेत'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 07:44 IST2018-05-17T07:43:51+5:302018-05-17T07:44:46+5:30
काँग्रेसच्या टीकेला भाजपाचं जोरदार प्रत्युत्तर

Karnataka Election Results: 'आणीबाणी लागू करणाऱ्यांनी आम्हाला घटनेच्या मर्यादा शिकवू नयेत'
नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. राज्यपालांनी भाजपाचे विधीमंडळ नेते येडियुरप्पा यांना सत्ता स्थापन करण्याचं आमंत्रण दिल्यानं काँग्रेसनं काल रात्री सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेसं संख्याबळ नसतानाही राज्यपालांनी भाजपाला संधी दिल्यानं काँग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांनी राज्यपालांवर तोंडसुख घेतलं. यानंतर भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर शरसंधान साधलं. ज्यांना देशात आणीबाणी लागू केली, त्यांनी आम्हाला घटनेच्या मर्यादा शिकवू नयेत, अशा शब्दांमध्ये प्रसाद काँग्रेसवर बरसले.
भाजपाकडे पुरेसं संख्याबळ नसल्यानं त्यांना सत्ता स्थापन करण्याचं निमंत्रण दिलं जाऊ नये, अशी भूमिका काँग्रेस आणि जेडीएसनं घेतली होती. मात्र राज्यपालांनी भाजपाला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिल्यानं काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. राज्यपालांचा निर्णय घटनाबाह्य असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली. काँग्रेसच्या या टीकेला भाजपानं जोरदार प्रत्युत्तर दिलं. '6 डिसेंबर 1992 नंतर काँग्रेस पक्षानं अनेक राज्यांमधील भाजपाची सरकारं बरखास्त केली होती. बाबरी मशीद पाडण्याची घटना उत्तर प्रदेशात घडली होती. मात्र यावरुन मध्य प्रदेश, राजस्थान आणि दिल्लीमधील भाजपा सरकारं पाडण्यात आली होती. काँग्रेसनं राज्यांमध्ये घटनाबाह्य पद्धतीनं आणीबाणी लागू केली होती. घटना उद्ध्वस्त करणाऱ्यांनी आम्हाला घटनेच्या मर्यादा शिकवू नयेत,' अशा शब्दांमध्ये प्रसाद यांनी काँग्रेसच्या टीकेला उत्तर दिलं.
राज्यपालांनी सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्या पक्षाला आमंत्रण द्यायचं, त्यावर आम्ही काहीही भाष्य करु शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे, अशी माहिती प्रसाद यांनी दिली. 'निवडणूक पूर्व युती करुन सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षांना सत्ता स्थापनेसाठी पहिल्यांदा संधी दिली जाते. त्यानंतर सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाला प्राधान्य दिलं जातं आणि सर्वात शेवटी निवडणुकीनंतर एकत्र येणाऱ्या पक्षांना सरकार स्थापन करण्याचं निमंत्रण दिलं जातं,' असंही प्रसाद यांनी म्हटलं.