Parliament Scuffle: प्रताप सारंगी, मुकेश राजपूत यांना काय झालं? प्रकृतीबद्दल RML ने दिली अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 18:20 IST2024-12-19T18:19:10+5:302024-12-19T18:20:44+5:30
अमित शाह यांच्या विधानाचा विरोध करत काँग्रेसने संसद परिसरात मोर्चा काढला. त्याविरोधात भाजपनेही निदर्शने केली. संसदेच्या दाराजवळ दोन्ही खासदार समोर आल्यानंतर भाजपचे दोन खासदार जखमी झाले.

Parliament Scuffle: प्रताप सारंगी, मुकेश राजपूत यांना काय झालं? प्रकृतीबद्दल RML ने दिली अपडेट
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानामुळे निर्माण झालेल्या राजकीय वादाने गुरुवारी (१९ डिसेंबर) नवे वळण घेतले. काँग्रेसचे खासदार आणि भाजपचे खासदार संसदेच्या दाराजवळ समोरा-समोर आले. यावेळी भाजपचे दोन खासदार जखमी झाले. राहुल गांधींनी धक्का दिल्याने पडल्याचे भाजपच्या खासदारांनी म्हटले. भाजपच्या खासदारांनी संसदेत जाण्यापासून रोखत मल्लिकार्जून खरगे यांना धक्का दिल्याचा आरोप काँग्रेसने केला. दरम्यान, भाजपच्या प्रकृती बिघडलेल्या खासदारांवर उपचार सुरू असून, रुग्णालयाने अपडेट दिली आहे.
भाजपचे खासदार प्रताप सारंग आणि मुकेश राजपूत यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीबद्दलचे अपडेट देण्यात आले आहे.
प्रताप सारंगी, मुकेश राजपूत यांची प्रकृती आता कशी आहे?
राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे अधिष्ठाता अजय शुक्ला यांनी सांगितले की, "दोन्ही नेत्यांच्या डोक्याला जखम झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत."
"दोन्ही नेत्यांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात येतील. सध्या लक्षणांवरून उपचार सुरू करण्यात आले आहेत. दोघांच्या डोक्याला जखमा झालेल्या असल्याने आयसीयूमध्ये दाखल केले गेले आहे", अशी माहिती शुक्ला यांनी दिली.
"प्रताप सारंगी यांना भरपूर रक्तस्त्राव होत होता आणि त्यांच्या डोक्यावर गंभीर जखम झाली आहे. त्यामुळे त्यांना टाके मारण्यात आले आहेत. त्यांच्या इतर तपासण्याही केल्या जात आहेत. मुकेश राजपूत बेशुद्ध झाले होते. आता ते शुद्धीवर आले असले, तरी त्यांना भोवळ येत असून, अस्वस्थ वाटत आहे. त्यांचे रक्तदाबही उच्च आहे", रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी सांगितले.
ह्रदयविकाराचा झटकाही येऊ शकतो -रुग्णालय
शुक्ला असेही म्हणाले की, "रुग्ण आणि त्याच्या वैद्यकीय चाचण्यांच्या रिपोर्टवर हे अवलंबून असेल की, त्यांना किती दिवस रुग्णालयात ठेवावं लागेल. सारंगी हे वयाने ज्येष्ठ आहेत. त्यामुळे धक्का बुक्की झाल्यास रक्तदाब वाढू शकतो. यातून ह्रदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. त्यांना ह्रदयाशी संबंधित रोग आहेत", असेही शुक्ला म्हणाले.
भाजपची राहुल गांधींवर टीका
केंद्रीय कृषीमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांनी राहुल गांधींवर टीका केली. "राहुल गांधी आणि काँग्रेस यांच्यासारखे गुंडागर्दीचे दुसरे उदाहरण नाही. भारताच्या संसदीय इतिहासात असे कधी घडले नाही. ते महाराष्ट्र आणि हरयाणात पराभूत झाले आहेत, त्याचे नैराश्य अशा प्रकारे का व्यक्त करत आहेत?", असे शिवराज सिंह म्हणाले.