विरोधकांनी विरोधी पक्षातच राहण्याचं ठरवलंय; PM नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 04:28 PM2023-12-19T16:28:05+5:302023-12-19T16:28:05+5:30

'काही पक्ष संसद घुसखोरीचे समर्थन करत आहेत.'

Parliament, Narendra Modi BJP Parliamentary Party Meeting, slams congress over parliament security breach | विरोधकांनी विरोधी पक्षातच राहण्याचं ठरवलंय; PM नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात

विरोधकांनी विरोधी पक्षातच राहण्याचं ठरवलंय; PM नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात


नवी दिल्ली:संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर विरोध संसदेथ सातत्याने गदारोळ करत आहेत. यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मंगळवारी यावरुन विरोधकांवर हल्लाबोल केला. भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत ते म्हणाले की, विरोधकांनी आपल्या जागेवर (विरोधी पक्षात) राहण्याचे ठरवले आहे. संसदेत घुसखोरी करणाऱ्यांच्या समर्थनार्थ काही पक्ष आवाज उठवत आहेत, हे घुसखोरीइतकेच धोकादायक आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

विरोधकांकडून त्या घटनेचे समर्थन
भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक संसदेच्या वाचनालयाच्या आवारात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने संसदे घुसखोरीच्या घटनेचा निषेध केला पाहिजे, परंतु काही पक्ष सुरक्षेतील त्रुटीचे समर्थन करत आहेत.

पराभवामुळे विरोधक नाराज
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच संसदेच्या सुरक्षेसाठी बेरोजगारी आणि महागाईला जबाबदार धरले होते. याबाबत पंतप्रधान म्हणाले, लोकशाहीवर विश्वास ठेवणारा पक्ष या घटनेचे समर्थन कसे करू शकतो, हेच मला समजत नाहीय. विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे विरोधी पक्ष नाराज आहेत आणि रागाच्या भरात संसदेचे कामकाज विस्कळीत करत आहेत, असंही पंतप्रधान म्हणाले 

आम्हाला हटवणे, हेच इंडिया आघाडीचे टार्गेट
पंतप्रधान पुढे म्हणतात, फक्त आमचा पराभव करणे, हेच I.N.D.I.A. आघाडीचे उद्दिष्ट आहे. पण, विरोधकांच्या या वर्तनामुळे 2024 मध्ये त्यांची संख्या आणखी कमी होईल. विरोधी खासदारांना संसदेच्या कामकाजाने काही फरक पडत नाही. काही विधेयके अत्यंत महत्त्वाची आहेत, ज्यांवर चर्चा व्हायला हवी. विरोधकांनी चर्चेत सहभाग घेतला असता तर बरे झाले असते, पण कदाचित चांगले काम त्यांच्या नशिबात नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
 

Web Title: Parliament, Narendra Modi BJP Parliamentary Party Meeting, slams congress over parliament security breach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.