दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 15:54 IST2025-07-28T15:53:20+5:302025-07-28T15:54:24+5:30

Parliament Monsoon Session 2025 : 'राजनाथ सिंह म्हणाले की, आमचे ध्येय युद्ध नव्हते. का नव्हते? आपण आज पीओके घेणार नाही, तर कधी घेणार?'

Parliament Monsoon Session: How did terrorists enter Pahalgam? Why was Operation Sindhu stopped? Congress' direct question to the government... | दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

Parliament Monsoon Session 2025 :संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सरकारची बाजू मांडताना विरोधकांचे सर्व आरोप खोडून काढले. ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले. ही एक यशस्वी कारवाई होती, असे त्यांनी म्हटले. मात्र, विरोधकांकडून सरकारवर जोरदार पलटवार करण्यात आला. 

दहशतवादी बैसरणमध्ये कसे घुसले?
राजनाथ सिंह यांच्या भषणानंतर काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले की, सभागृहात सत्य बाहेर समोर आले पाहिजे. पहलगाम, ऑपरेशन सिंदूर आणि परराष्ट्र धोरणाबद्दल सत्य बाहेर आले पाहिजे. राजनाथ सिंह यांनी बरीच माहिती दिली, परंतु पहलगाममधील बैसरणमध्ये दहशतवादी कसे घुसले? हे त्यांनी सांगितले नाही. देशाच्या हितासाठी विरोधी पक्ष म्हणून प्रश्न विचारणे हे आमचे कर्तव्य आहे. देशाला जाणून घ्यायचे आहे की, ते दहशतवादी तिथे घुसलेच कसे? त्यांचा हेतू काय होता? देशातील लोकांना हेदेखील जाणून घ्यायचे आहे की, शंभर दिवस उलटून गेले, पण सरकार अजून त्यांना का पकडू शकले नाही? कोणीतरी त्यांना पळून जाण्यास मदत केली का? शंभर दिवसांनंतरही सरकारकडे याचे उत्तर नाही.

सरकारला  जबाबदारी घ्यावी लागेल 
गौरव गोगोई पुढे म्हणतात, तुम्ही म्हणालात की आम्ही कलम १९ रद्द केले, आता जम्मू काश्मीर सुरक्षित आहे. मात्र पहलगामच्या घटनेवेळी लोक किती असहाय्य होते, हे सर्वांनी पाहिले. राजनाथ सिंह बैसरनच्या दहशतीवर एक शब्द तरी बोलायला हवा होता. ही तुमचीही जबाबदारी आहे. गृहमंत्री जाऊन म्हणतात की, आम्ही दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले, मात्र पुलवामा होतो. जबाबदारी कोण घेतो? तर उपराज्यपाल. गृहमंत्रीजी, तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल. तुम्ही उपराज्यपालांच्या मागे लपू शकत नाही. 

पंतप्रधान मोदी सौदीमध्ये होते. परत आल्यानंतर पहलगामला जाणे हे त्यांचे नैतिक कर्तव्य होते. पण, ते पहलगामला न जाता बिहारला गेले आणि निवडणूक भाषणे दिली. पहलगाममध्ये शहीद झालेल्या लोकांबद्दल कोणी बोलत होते, तर ते आमचे नेते राहुल गांधी होते. २०१६ मध्ये सरकारने म्हटले नव्हते का की, आम्ही घुसून दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करू. पुलवामा हल्ल्यानंतर त्यांनी तेच म्हटले होते आणि आजही तेच तेच सांगत आहेत. पाकिस्तानवर तीव्र कारवाई का केली नाही? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

कारवाई का थांबवली?
सैन्याने सुरुवातीला २१ लक्ष्ये निवडली होती, नंतर नऊ करण्यात आली. असे का? आम्ही सर्वांनी एकत्र येऊन पंतप्रधान मोदींना पूर्ण पाठिंबा दिला होता. संपूर्ण देश पंतप्रधान मोदींसोबत होता. १० मे रोजी माहिती येते की, युद्धविराम झाला. असे का केले? जर पाकिस्तान खरोखरच गुडघे टेकण्यास तयार होता, तर तुम्ही का थांबलात? तुम्ही का झुकलात? तुम्ही कोणासमोर आत्मसमर्पण केले? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी २६ वेळा म्हटले की, आम्ही युद्ध थांबवले. ट्रम्प म्हणाले की, भारताची पाच-सहा विमाने पाडण्यात आली. देशाला हे सत्य समजले पाहिजे. किती विमाने पाडली, हे तुम्ही सांगायला हवे. परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत आपण अयशस्वी झालो, अशी टीकाही गोगोई यांनी केली.

आता नाही, तर कधी पीओके घेणार?
गौरव गोगोई पुढे म्हणतात, राजनाथ सिंह म्हणाले की, आमचे ध्येय युद्ध नव्हते. का नव्हते? आपण आज पीओके घेणार नाही, तर कधी घेणार? आपल्याकडे जगातील सर्वोत्तम लढाऊ विमाने आहेत. सीडीएस यांना असे का म्हणावे लागले की, आपली लढाऊ विमाने रेंजमध्ये जाऊ शकत नाहीत, दूरवरून हल्ला करावा लागला. आपण पाकिस्तानात का घुसून हल्ले केले नाही? आम्हाला ही माहिती द्या. सैन्य अधिकारी राहुल आर सिंह म्हणाले होते की, पाकिस्तान चीन पाठिंबा देत आहे. तुम्ही तुमच्या भाषणात एकदाही चीनचा उल्लेख का केला नाही? असा प्रशनही त्यांनी यावेळी सरकारला केला. आम्ही सरकारचे शत्रू नाही. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आम्ही आजही सरकारसोबत उभे आहोत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Web Title: Parliament Monsoon Session: How did terrorists enter Pahalgam? Why was Operation Sindhu stopped? Congress' direct question to the government...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.