विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या एका अप्रकाशित पुस्तकातील मजकुरावरून सनसनाटी आरोप केल्यापासून लोकसभेमध्ये सत्ताधारी विरोधक आमने सामने आलेले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेले आरोप प्रत्यारोप आणि गदारोळामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर भाषण करता आलं नाही. दरम्यान, लोकसभेतील या गरमा गरमीचे पडसाद आज राज्यसभेमध्येही उमटले. तसेच राज्यसभेतील सभागृहाते नेते जे.पी. नड्डा आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यावेळी राज्यसभेच्या कामकाजात अडथळा न आणण्याचं आवाहन करताना नड्डा यांनी ‘काँग्रेस पक्षाला एका अजाण बालकाकडे ओलीस ठेवू नका’, असा सल्ला मल्लिकार्जुन खर्गे यांना दिला.
आज कामकाजाला सुरुवात झाल्यापासून राज्यसभेमध्ये गदारोळाला सुरुवात झाली. यावेळी संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सभागृहाच्या कामकाजामध्ये विरोधकांनी अडथळे आणू नयेत, असं आवाहन केलं. तसेच राहुल गांधी यांना लोकसभेत बोलू दिलं नाही, हा आरोप चुकीचा आहे. त्यांना लोकसभेत निर्धारित वेळेपेक्षा २० मिनिटे अधिक बोलू देण्यात आलं. मात्र त्यांनी लोकसभा अध्यक्षांनी घालून दिलेल्या नियमांचे वारंवार उल्लंघन केलं, असे रिजिजू म्हणाले.
त्यानंतर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. मात्र त्यांच्या भाषणातील एक शब्द सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्यात आला. खर्गे म्हणाले की, लोकसभा आणि राज्यसभा अशी दोन सभागृहे मिळून संसद बनते. जर एका सभागृहात विरोधी पक्षनेत्याला बोलू दिलं गेलं नाही तर त्याचे पडसाद दुसऱ्या सभागृहातही उमटतील. सध्या सत्ताधाऱ्यांना अहंकार झालेला आहे. ते लोकशाहीला चिरडून टातू इच्छित आहेत. ते विरोधी पक्षांचा आवाज दाबू इच्छित आहेत, असा आरोप खर्गे यांनी केला.
यावेळी मल्लिकार्जुन खर्गे आणि जे.पी. नड्डा यांच्यातही जोरदार खडाजंगी झाली. सभागृहाच्या कामकाजात अडथळे न आणण्याचं आवाहन करताना नड्डा यांनी काँग्रेस पक्षाला एका अजाण बालकाकडे ओलीस ठेवू नका, असा टोला लगावला. अजाणपणा आणि अहंकार यांचं मिश्रण भयंकर असतं. काँग्रेस पक्षाने अशा अजाण व्यक्तीच्या प्रभावापासून बाहेर पडलं पाहिजे, असा सल्लाही नड्डा यांना दिला.
Web Summary : Parliament witnessed heated exchanges after Rahul Gandhi's accusations. Nadda urged Kharge not to let Congress be held hostage by an "ignorant child," amidst disruptions and accusations between ruling and opposition parties regarding parliamentary procedures and freedom of speech.
Web Summary : राहुल गांधी के आरोपों के बाद संसद में तीखी नोकझोंक हुई। नड्डा ने खड़गे से आग्रह किया कि कांग्रेस को एक "अज्ञानी बच्चे" द्वारा बंधक न बनाया जाए, संसदीय प्रक्रियाओं और भाषण की स्वतंत्रता के संबंध में सत्तारूढ़ और विपक्षी दलों के बीच व्यवधान और आरोप-प्रत्यारोप हुए।