आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 18:22 IST2025-10-15T18:19:30+5:302025-10-15T18:22:25+5:30
Rajasthan Jaisalmer Bus Fire News: जैसलमेर बस दुर्घटनेत जोधपूर जिल्ह्यातील सेतरावा परिसरातील लावरण गावातील रहिवासी महेंद्र मेघवाल यांचे अख्ख कुटुंब जळून खाक झाले.

आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
राजस्थानमधील जैसलमेर-जोधपूर महामार्गावर मंगळवारी (१४ ऑक्टोबर २०२५) दुपारी एका एसी बसला लागलेल्या भीषण आगीमुळे मोठी दुर्घटना घडली. या हृदयद्रावक घटनेत २० प्रवाशांचा मृत्यू झाला असून, १६ जण जखमी झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत जोधपूर जिल्ह्यातील सेतरावा परिसरातील लावरण गावातील रहिवासी महेंद्र मेघवाल यांचे अख्ख कुटुंब जळून खाक झाले.
जैसलमेरमधील आर्मी डेपोत कार्यरत असलेले महेंद्र मेघवाल (वय, ३५) हे आपल्या कुटुंबासह जैसलमेरहून जोधपूरला घरी परतत होते. मात्र, रस्त्यातच त्यांच्या बसला आग लागली आणि त्यांचे अख्खं कुटुंब जळून खाक झाले. या दुर्दैवी अपघातात महेंद्र यांच्यासोबत त्यांची पत्नी पार्वती मेघवाल , मुलगी खुशबू मेघवाल , मुलगी दीक्षा मेघवाल आणि मुलगा शौर्य मेघवाल यांचाही मृत्यू झाला आहे. महेंद्रच्या देचू येथील घरी त्यांची वृद्ध आई आपल्या नातवंडांची आणि मुलाची आतुरतेने वाट पाहत होती. मात्र, आपल्या लाडक्या मुलाचे आणि संपूर्ण कुटुंबाचे अपघाती निधन झाल्याचे वृत्त ऐकून त्यांना मोठा धक्का बसला.
मृतांची ओळख पटवणे कठीण
अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, बस जळून खाक झाली, ज्यामुळे मृतांची ओळख पटवणे कठीण झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलीस आणि प्रशासनाने पुढील कारवाई सुरू केली आहे.
महेंद्रच्या आईला जोधपूर येथे आणण्याचा प्रयत्न
पोलीस सध्या महेंद्रच्या वृद्ध आईला जोधपूर येथे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आवश्यक असल्यास, डीएनए चाचणी करण्यासाठी डॉक्टरांच्या एका टीमला जोधपूरहून देचूला पाठवण्याची तयारी दर्शवली आहे. या असह्य वेदना आणि शोकाकुल वातावरणाने या भीषण अपघाताची तीव्रता अधोरेखित केली.