Cough Syrup : "पप्पा, घरी जाऊया...", कफ सिरपमुळे मुलीने गमावला जीव; १६ डायलिसिस, २२ दिवस मृत्यूशी झुंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 12:56 IST2025-10-07T12:55:30+5:302025-10-07T12:56:12+5:30
Cough Syrup Death: मुलगी लवकर बरी होईल. पण त्या सिरपने तिचा जीव घेतला. योजिता तब्बल २२ दिवस मृत्यूशी झुंज देत होती.

Cough Syrup : "पप्पा, घरी जाऊया...", कफ सिरपमुळे मुलीने गमावला जीव; १६ डायलिसिस, २२ दिवस मृत्यूशी झुंज
Cough Syrup Death: दोन वर्षांच्या योजिता ठाकरेला हलका ताप आला होता. तिचे वडील सुशांत तिला डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी इतर औषधांसह एक सिरप लिहून दिले. सर्वांना वाटलं की, मुलगी लवकर बरी होईल. पण त्या सिरपने तिचा जीव घेतला. योजिता तब्बल २२ दिवस मृत्यूशी झुंज देत होती. १६ वेळा तिचं डायलिसिस केल्यानंतरही तिला वाचवता आलं नाही.
८ सप्टेंबर रोजी छिंदवाडा येथील एका खासगी शाळेत शिकवणारा सुशांत ठाकरे त्याची मुलगी योजिताला घेऊन डॉक्टरकडे पोहोचला. ज्यांच्याकडे नेहमी उपचार घेत असे, ते डॉक्टर त्या दिवशी क्लिनिकमध्ये नव्हते. सुशांतने जवळच्या डॉक्टर प्रवीण सोनीशी संपर्क साधला. डॉ. सोनी यांनी काही औषधं लिहून दिली आणि ती चार वेळा देण्याचा सल्ला दिला, "काहीही अडचण नाही, ती उद्यापर्यंत बरी होईल" असं सांगितलं. सुशांतने त्याच्या मुलीला त्यांच्यासमोर पहिला डोस दिला. दुसरा रात्री तीन वाजता, तिसरा पहाटे आणि चौथा दुपारी. पण त्या दिवसानंतर जे घडले त्यामुळे संपूर्ण कुटुंब हादरून गेलं.
भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
दुसऱ्या दिवशी सकाळी ताप कमी झाला, पण योजिताची प्रकृती आणखी बिघडली. तिला उलट्या झाल्या. सुशांत पुन्हा डॉ. प्रवीण सोनी यांच्याकडे गेला. डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यानंतर सांगितलं, "किडनीला इन्फेक्शन झालं आहे. तिला ताबडतोब नागपूरला घेऊन जा. छिंदवाड्यात ती बरी होऊ शकत नाही. सुशांतने मुलीला नागपूरला नेलं.
"लेकाच्या उपचारासाठी रिक्षा विकली, डायलिसिससाठी नव्हते पैसे, ३ लाखांचा खर्च"; वडिलांचा टाहो
नागपूरला पोहोचल्यावर, डॉक्टरांनी सांगितलेल्या रुग्णालयात डायलिसिसची सुविधा नव्हती. योजिताला त्याच रात्री नेल्सन रुग्णालयात नेण्यास भाग पाडण्यात आलं. तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष सुरू झाला. २२ दिवसांचे सतत उपचार, १६ डायलिसिस, व्हेंटिलेटर आणि असंख्य इंजेक्शन्स. प्रत्येक डायलिसिसमुळे सुशांतच्या आशा मावळत होत्या. "पप्पा, चला घरी जाऊया..." असं त्याची लेक त्याला सारखं म्हणायची.
"कफ सिरपने मुलाचा जीव घेतला, उपचारासाठी जमीन गहाण ठेवून ४ लाखांचं कर्ज, पण... "
नेल्सन हॉस्पिटलचं बिल १२ लाख रुपयांपेक्षा जास्त झालं आहे. सुशांत एक साधा शिक्षक आहे, त्याचा महिन्याचा पगार त्याच्या कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी जेमतेम होता. तरीही, त्याने हार मानली नाही. त्याच्या भावाने एफडी मोडली, मित्रांनी मदत केली आणि त्याच्या सासरच्यांनी त्यांच्याकडे जे काही होते ते दिलं. मुंबईतील एका स्वयंसेवी संस्थेने एक लाख पाठवले. शाळेतील सहकारी शिक्षक आणि शेजाऱ्यांनीही मदतीचा हात पुढे केला. पण मुलीचा जीव वाचला नाही.