पाकिस्तानची नापाक खेळी; राजस्थानमध्ये ड्रोनने पाठवली 'पांढरी पावडर', पोलिसांनी असा लावला छडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 11:55 IST2026-01-03T11:53:38+5:302026-01-03T11:55:56+5:30
सीमेपलीकडून भारतात अमली पदार्थांची तस्करी करण्याचा पाकिस्तानचा आणखी एक नापाक प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे.

पाकिस्तानची नापाक खेळी; राजस्थानमध्ये ड्रोनने पाठवली 'पांढरी पावडर', पोलिसांनी असा लावला छडा
सीमेपलीकडून भारतातअमली पदार्थांची तस्करी करण्याचा पाकिस्तानचा आणखी एक नापाक प्रयत्न राजस्थान पोलिसांनी हाणून पाडला आहे. श्रीगंगानगर जिल्ह्यातील रावला पोलिसांनी बीएसएफच्या मदतीने मोठी कारवाई करत तब्बल २० कोटी रुपये किमतीचे ४ किलो ८८ ग्रॅम हेरॉईन जप्त केले आहे. याप्रकरणी तीन आंतरराष्ट्रीय तस्करांना अटक करण्यात आली असून, तस्करीसाठी वापरण्यात आलेले 'चायना मेड' ड्रोनही पोलिसांनी हस्तगत केले आहे.
भरारी पथकाची गस्त अन् संशयास्पद हालचाली
एसपी अमृता दुहन यांनी दिलेल्या माहितीनुसार, रावला हा भाग भारत-पाकिस्तान सीमेजवळ असल्याने येथे कडेकोट बंदोबस्त तैनात होता. १ जानेवारी रोजी पोलीस पथक गस्त घालत असताना १५ केएनडी पुलाजवळ तीन तरुण संशयास्पद स्थितीत फिरताना दिसले. पोलिसांची गाडी पाहताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पोलिसांनी घेराबंदी करून त्यांना जागीच पकडले. त्यांची झडती घेतली असता प्लास्टिकच्या कट्ट्यातून कोट्यवधींचे ड्रग्ज आणि ड्रोन बाहेर आले.
असा झाला २० कोटींचा पर्दाफाश
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तस्करांची ओळख जगनदीप सिंह (२६), नीटू सिंह (२१) आणि सतपाल सिंह (२७) अशी पटली आहे. या तिघांनीही हेरॉईन आपापसात वाटून लपवून ठेवले होते. जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनचे एकूण वजन ४ किलो ८८ ग्रॅम असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत २० कोटी रुपयांच्या घरात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे ड्रग्ज २९-३० डिसेंबरच्या रात्री ड्रोनद्वारे पाकिस्तानमधून भारतात मागवण्यात आले होते.
जामिनावर सुटले अन् पुन्हा गुन्ह्यात अडकले!
या कारवाईतील एक रंजक बाब म्हणजे, याच तीन आरोपींना पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी शांतता भंग केल्याप्रकरणी अटक केली होती. मात्र, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना जामिनावर सोडण्यात आले. जामिनावर बाहेर येताच या तिघांनी थेट सीमेवर जाऊन पाकिस्तानकडून आलेले ड्रग्ज गोळा केले. मात्र, पोलिसांना गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीमुळे त्यांचा हा 'दुसरा प्लॅन' पूर्णपणे फसला.
सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर
सीमेपासून अवघ्या ४ किलोमीटर अंतरावर ही मोठी कारवाई झाल्यामुळे सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. जप्त करण्यात आलेले ड्रोन 'डीजीआय' कंपनीचे असून ते चीन बनावटीचे आहे. ड्रोनच्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी करण्याचे प्रमाण वाढत असल्याने बीएसएफ आणि स्थानिक पोलिसांनी शोध मोहीम तीव्र केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामागे आणखी मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.