पाकिस्तानच्या कुरापती सुरूच! सांबाच्या फ्लोरा गावात ड्रोनने पाडलं पॅकेट; बीएसएफने उधळला पाकचा डाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 09:27 IST2026-01-10T09:17:49+5:302026-01-10T09:27:34+5:30
सांबा सेक्टरमध्ये शुक्रवारी मध्यरात्री पाकिस्तानने पुन्हा एकदा ड्रोनचा वापर करून शस्त्रास्त्रांची तस्करी करण्याचा प्रयत्न केला.

पाकिस्तानच्या कुरापती सुरूच! सांबाच्या फ्लोरा गावात ड्रोनने पाडलं पॅकेट; बीएसएफने उधळला पाकचा डाव
जम्मू-काश्मीरमधील सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून सुरू असलेल्या कुरापती थांबण्याचे नाव घेत नाहीत. सांबा सेक्टरमध्ये शुक्रवारी मध्यरात्री पाकिस्तानने पुन्हा एकदा ड्रोनचा वापर करून शस्त्रास्त्रांची तस्करी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी वेळीच हालचाल करत हा कट उधळून लावला आहे. या कारवाईत जवानांनी मोठी शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला असून परिसरात शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.
मध्यरात्रीच्या अंधारात 'एअर ड्रॉप'
ही घटना शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. बीएसएफच्या १२५ व्या बटालियनच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या फ्लोरा गावाजवळ एक संशयास्पद ड्रोन घोंघावत असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. पाकिस्तानच्या बाजूने आलेल्या या ड्रोनने काही संशयास्पद वस्तू खाली पाडल्याचे जवानांच्या निदर्शनास आले. त्यानंतर सुरक्षा दलांनी तातडीने संपूर्ण परिसराला वेढा घातला आणि शोधमोहीम सुरू केली.
काय काय सापडले पॅकेटमध्ये?
पहाटेपर्यंत चाललेल्या या सर्च ऑपरेशन दरम्यान जवानांना एक संशयास्पद पॅकेट सापडले. हे पॅकेट उघडले असता सुरक्षा यंत्रणांचेही डोळे विस्फारले. या पॅकेटमधून २ अत्याधुनिक पिस्तुलं, ३ पिस्तूल मॅगझिन, १६ जिवंत काडतूसं, १ हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे.
कोणासाठी होती ही खेप?
सांबा सेक्टरमध्ये गेल्या दोन महिन्यांत अनेकदा संशयास्पद ड्रोन्स दिसले आहेत. जम्मू-काश्मीर प्रशासनाने काही भागांत 'व्हीपीएन'वर बंदी घातल्यानंतर अशा प्रकारच्या ड्रोन हालचाली वाढल्याचे दिसून येत आहे. ही शस्त्रास्त्रांची खेप सीमेच्या या बाजूला कोणासाठी पाठवण्यात आली होती आणि ती घेणारे स्थानिक हस्तक कोण होते, याचा तपास आता गुप्तचर यंत्रणा करत आहेत.
सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर
या घटनेनंतर सांबासह संपूर्ण जम्मू सीमा भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. लष्कर आणि पोलिसांनी संयुक्तपणे परिसरातील संशयास्पद ठिकाणांची तपासणी सुरू केली आहे. पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या या ड्रोन हल्ल्यांमुळे सीमावर्ती भागातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असले, तरी भारतीय जवान चोवीस तास डोळ्यात तेल घालून सीमांचे रक्षण करत आहेत.