भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 06:35 IST2025-04-26T06:34:10+5:302025-04-26T06:35:02+5:30
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांचा ठाम शब्दांत पुनरुच्चार; सिंधू जल करार स्थगित करण्याची अधिसूचना जारी करत भारताचा सज्जड इशारा

भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
नवी दिल्ली - भारताकडूनपाकिस्तानला पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही. तशी रणनीती केंद्र सरकार तयार करत आहे, असे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी शुक्रवारी ठामपणे सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर पाटील यांनी हे वक्तव्य केले.
सी. आर. पाटील म्हणाले की, सिंधू जल करार भारताने स्थगित केला असून, या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. भारतातून पाकिस्तानला पाण्याचा एकही थेंब दिला जाणार नाही, यावर केंद्र सरकार ठाम आहे. १९६० साली भारत व पाकिस्तानने सिंधू जल करार केला होता. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने हा करार स्थगित केला आहे. पाटील यांनी सांगितले की, सीमेपलीकडून सतत होणाऱ्या दहशतवादी कारवायांमुळे पाकिस्तानने दोन देशांतील कराराच्या अटींचा भंग केला आहे. त्यामुळे हा करार स्थगित करण्यात येत असल्याचे भारताने पाकिस्तानला कळविले आहे.
आमचा काहीही संबंध नाही, पाकिस्तानने केले हात वर
पहलगामच्या हल्ल्याशी आमच्या देशाचा काहीही संबंध नाही. यासंदर्भात भारत करत असलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असा ठराव पाकिस्तानच्या संसदेत शुक्रवारी संमत करण्यात आला.