१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 02:55 IST2025-05-13T02:55:14+5:302025-05-13T02:55:14+5:30
पाकला हा फटका एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडील भागात बसला आहे. पाकिस्तानला मोठी हानी सहन करावी लागली आहे.

१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
सुरेश एस. डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू : भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतीय शहरे आणि गावांवर केलेल्या हल्ल्यांना भारतीय सुरक्षा दलांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यात पाकिस्तानला मोठी हानी सहन करावी लागली आहे. एलओसीवर पाकिस्तानने आपले ४० हून अधिक सैनिक आणि अधिकारी गमावले आहेत. भारतीय हवाई दलाच्या अचूक कारवाईत त्यांच्या १२ एअरबेसवर हल्ले झाले, ज्यात पाकिस्तानच्या ५२ पेक्षा अधिक वायुसैनिकांचा आणि अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तथापि, ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतालाही आठ जवानांचे बलिदान द्यावे लागले आहे.
पाकला हा फटका एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडील भागात बसला आहे. भारतीय लष्करी संचालनालयाच्या (डीजीएमओ) माहितीनुसार, पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सीमेपलीकडून विश्वासू सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाक हवाई दलाच्या धावपट्ट्या, हँगर, एअर डिफेन्स यंत्रणा आणि रडार यांचेही अतोनात नुकसान झाले आहे. १९७१ च्या युद्धानंतर प्रथमच पाक हवाई दलाला इतक्या मोठ्या प्रमाणावर वायुसैनिक गमवावे लागले आहेत. त्यामुळे पाकिस्तान आतून पूर्णपणे हादरला आहे.
बलौरी एअरबेसवर सर्वाधिक नुकसान
भारतीय हवाई दलाच्या डीजीएमओंनी सांगितले की, सुमारे अर्धा डझन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडण्यात आली. यात त्यांचे पायलटदेखील ठार झाले. सर्वांत मोठे नुकसान सिंध प्रांतातील बलौरी एअरबेसवर झाले. तेथे भारताच्या कारवाईत स्क्वाड्रन लीडर उस्मान युसूफसह १२ पाक वायुसैनिक ठार झाले. १२ हून अधिक एअरबेसवर हल्ले करण्यात आले, त्याच ठिकाणांहून भारतावर हवाई हल्ले करण्यात येत होते.