पाकिस्तानने स्वतः युद्धविरामाची चर्चा केली, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा फेटाळला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 13:54 IST2025-05-22T12:53:24+5:302025-05-22T13:54:41+5:30
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून युद्धविरामा प्रस्ताव आला होता, असेही जयशंकर यांनी सांगितले.

पाकिस्तानने स्वतः युद्धविरामाची चर्चा केली, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा फेटाळला!
परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी एका डच वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेने भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षावर मध्यस्थी केल्याचा दावा स्पष्टपणे फेटाळला आहे. त्यांनी सांगितले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांचा परस्पर संपर्क झाला आणि त्यातूनच युद्धविरामाची चर्चा झाली. अमेरिकेचा मध्यस्थीचा दावा खोटा असून, दोन्ही देशांमधील परिस्थिती दोहोंच्या संवादातूनच निवळली, असे त्यांनी स्पष्ट केले.
पहलगाम येथील हल्ल्याचे उद्दिष्ट धार्मिक उन्माद पसरवणे होते, असे जयशंकर यांनी नमूद केले. या हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, "आम्ही या काळात अमेरिकेसह इतर अनेक देशांशी संपर्कात होतो, पण भारताने कोणत्याही तृतीय पक्षाच्या मध्यस्थीशिवाय पाकिस्तानसोबत थेट संवाद साधला."
पाकिस्तानने स्वतःच युद्धविरामाचा प्रस्ताव मांडला!
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून युद्धविरामा प्रस्ताव आला होता, असेही जयशंकर यांनी सांगितले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने दहशतवाद्यांवर केलेल्या निर्णायक कारवाईमुळे पाकिस्तानला माघार घ्यावी लागली होती. यानंतरच संघर्ष थांबला आणि सीमारेषेवर तात्पुरती शांतता प्रस्थापित झाली.
मी व्यवसायाद्वारे भारत-पाक तणाव कमी केला : ट्रम्प
दरम्यान, अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला की, त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील तणाव व्यवसाय आणि संवादाच्या माध्यमातून कमी केला. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्याशी संवादादरम्यान ट्रम्प म्हणाले, "मी भारतासोबत खूप काम केलं, पाकिस्तानसोबतही काम केलं. आम्ही त्यांच्याशी बोललो आणि युद्धविराम घडवून आणला. पाकिस्तानमध्ये काही अद्भुत लोक आहेत, चांगले नेते आहेत, आणि भारतही माझा चांगला मित्र आहे."