प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 06:25 IST2025-05-10T06:24:37+5:302025-05-10T06:25:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : पाकिस्तानने गुरुवारी रात्री साडेआठ वाजता भारतातील सीमेजवळील नागरी वस्त्या, धार्मिक स्थळे आणि लष्करी ...

प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पाकिस्तानने गुरुवारी रात्री साडेआठ वाजता भारतातील सीमेजवळील नागरी वस्त्या, धार्मिक स्थळे आणि लष्करी तळ अशा ३६ ठिकाणी ३०० ते ४०० ड्रोनच्या साहाय्याने हल्ले केले. हे सर्व ड्रोन भारताने पाडले. तसेच, भारताचे प्रत्युत्तर रोखण्यासाठी पाकिस्तानने आपली हवाई हद्द खुली ठेवून नागरिकांना ढाल म्हणून वापरण्याचा घातकी प्रयत्न केला, अशी माहिती परराष्ट्र खात्याने शुक्रवारी दिली. कर्नल सोफिया यांनी पत्रकार परिषदेत त्याचा छायाचित्रासह पुरावाही दाखविला.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी भारताकडून पाकिस्तानी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले जात असल्याचे ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत सुरू असलेल्या कारवाईची माहिती देण्यासाठी आयोजित संयुक्त पत्रपरिषदेत सांगितले.
पाक करतोय प्रार्थनास्थळांवर हल्ले
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले की, पाकिस्तानने भारतातील शहरे, नागरी वस्त्या, काही लष्करी तळांवर हल्ला केला. मात्र भारतीय लष्कराने संयम राखत चोख प्रत्युत्तर दिले. भारतातील कोणत्याही प्रार्थनास्थळावर आपण हल्ला केला नाही, असा पाकिस्तानने केलेला दावा खोटा आहे. पुंछमधील गुरुव्दारावर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात तेथील रागी व काही शीख भाविकांचा मृत्यू झाला.
नानकाना साहिब गुरुव्दारावर भारताने हल्ला केल्याचा पाकिस्तानचा आरोप खोटा आहे. पाकिस्तानच्या माऱ्यातील तोफगोळा पुंछमधील चर्चवर पडल्यामुळे एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. पाकिस्तानकडून चर्च, गुरुद्वारे आणि मंदिरांवर हल्ले सुरू आहेत. पहलगाम हल्ल्याच्या घटनेपासूनच पाकिस्तान सर्व गोष्टींना धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप मिस्री यांनी केला.
पूंछ येथे पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात कॉन्व्हेंट शाळेतील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मंदिर, गुरुद्वारा आणि शाळांना टार्गेट करून पाकिस्तानने खालची पातळी गाठली आहे, असेही मिस्री म्हणाले.
तुर्कीचे सोंगर ड्रोन वापरून सुरू आहेत भारतावर हल्ले
सोफिया यांनी सांगितले की, पाकिस्तानने वापरलेले ड्रोन हे तुर्की असिसगार्ड सोंगर ड्रोन असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. याची फॉरेंसिक तपासणी केली जात आहे.
पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्राचा अयशस्वी हल्ला केला. मात्र, पाकिस्तानने आपले नागरी हवाई क्षेत्र बंद केले नाही. ही विमान सेवा भारताच्या हल्ल्यापासून आपला बचाव करेल ही त्यामागची भूमिका असल्याचे व्योमिका सिंग यांनी सांगितले. भारतीय लष्कराने प्रत्येक हल्ला हाणून पाडत लाहोर, कराची आणि सियालकोटमधील लष्करी तळांवर जोरदार निशाणा साधला.