पाकिस्तान सर्वात घाण; जगातील सर्वाधिक प्रदूषित देशांमध्ये अव्वल, भारत कितव्या स्थानी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 08:26 IST2026-03-25T08:26:08+5:302026-03-25T08:26:37+5:30
या यादीत बांगलादेश आणि ताजिकिस्तानचा क्रमांक लागत असून, दक्षिण आशियाई देशांमध्ये प्रदूषणाचे संकट गडद होताना दिसत आहे.

पाकिस्तान सर्वात घाण; जगातील सर्वाधिक प्रदूषित देशांमध्ये अव्वल, भारत कितव्या स्थानी?
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : वाढते शहरीकरण आणि हवामान बदलामुळे जगभरातील हवेची गुणवत्ता कमालीची खालावली आहे. स्विस एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी कंपनी 'आयक्यूएअर'ने प्रसिद्ध केलेल्या 'वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट २०२५'नुसार, पाकिस्तान हा जगातील सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे. या यादीत बांगलादेश आणि ताजिकिस्तानचा क्रमांक लागत असून, दक्षिण आशियाई देशांमध्ये प्रदूषणाचे संकट गडद होताना दिसत आहे.
जागतिक प्रदूषणाची भीषण आकडेवारी
१४३ देश आणि ९,४४६ शहरांमधील डेटाचे विश्लेषण करून हा आठवा वार्षिक अहवाल तयार करण्यात आला आहे. अहवालानुसार, प्रदूषित देशांच्या क्रमवारीत पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर आहे, त्यापाठोपाठ बांगलादेश (दुसरा), ताजिकिस्तान (तिसरा), चाड (चौथा) आणि काँगो (पाचवा) या देशांचा समावेश होतो.
भारत या यादीत सहाव्या स्थानावर आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जगातील केवळ १४ टक्के शहरे जागतिक आरोग्य संघटनेच्या ५ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर या वार्षिक मानकांची पूर्तता करू शकली.
भारतातील ‘टॉप ५’ प्रदूषित शहरे
अहवालात, भारतातील ५ शहरे जगातील पहिल्या १० प्रदूषित शहरांच्या यादीत आहेत :
लोनी (उत्तर प्रदेश) : जगातील क्रमांक १ चे प्रदूषित शहर.
बर्निहाट : दुसऱ्या स्थानी.
दिल्ली : चौथ्या स्थानी.
गाझियाबाद : प्रदूषित शहरांच्या यादीत.
उला : पहिल्या १० मध्ये.
कॅनडा, युरोपला वणव्यांचा तडाखा
२०२५ मध्ये जागतिक प्रदूषणात वाढ होण्यामागे हवामान बदलामुळे लागलेले भीषण वणवे हे प्रमुख कारण ठरले आहे. युरोपमधील २३ देशांमध्ये प्रदूषणाच्या पातळीत वाढ नोंदवण्यात आली असून केवळ १८ देशांमध्ये घट झाली आहे.
ऑस्ट्रेलिया, आइसलँड, एस्टोनिया, पनामा, फ्रेंच पोलिनेशिया, बर्मुडा आणि अंडोरा यांसारखे केवळ १३ देश आणि प्रदेश जागतिक आरोग्य संघटनेच्या वार्षिक सरासरी मानकांची पूर्तता करू शकले आहेत.
अहवालानुसार ५४ देशांमध्ये प्रदूषणात वाढ झाली असून ७५ देशांमध्ये काही प्रमाणात घट दिसून आली आहे. वाढते औद्योगिक उत्सर्जन आणि जीवाश्म इंधनाचा वापर यामुळे जागतिक हवामान आणीबाणीची स्थिती निर्माण झाली असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.