भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 17:56 IST2025-05-05T17:56:14+5:302025-05-05T17:56:50+5:30
Cyber Attacks Indian Defense Websites: गेल्या महिन्यात जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे तणावपूर्ण बनलेले आहेत. यादरम्यान, दोन्ही देशांकडून आपल्या लष्करी बळाची चाचपणी सुरू आहे.

भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
गेल्या महिन्यात जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे तणावपूर्ण बनलेले आहेत. यादरम्यान, दोन्ही देशांकडून आपल्या लष्करी बळाची चाचपणी सुरू आहे. त्यातच कुरापतखोर पाकिस्तानने आता भारतावर सायबर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानमधील हॅकर्सनी भारताच्या संरक्षण दलाशी संबंधित काही संकेतस्थळांना लक्ष्य केलं आहे. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार भारताच्या काही महत्त्वपूर्ण संरक्षण संकेतस्थळांना लक्ष्य करण्यात आलं असून, संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची गोपनीय माहिती लीक झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
लष्कराकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पाकिस्तान सायबर फोर्स नावाच्या एका एक्स हँडलने मिलिट्री इंजिनियर सर्व्हिसेस (एमईएस) आणि मनोहर पर्रिकर संरक्षण अध्ययन आणि विश्लेषण संस्था (आयडीएसए) यांच्या डाटामध्ये घुसखोरी केली आहे. या सायबर हल्ल्यात संरक्षण कर्मचाऱ्यांचे लॉगिन क्रेडेंशिल्ससह बरीचशी गोपनीय माहिती लीक झाली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.
याशिवाय पाकिस्तान हॅकर्स ग्रुपने संरक्षण मंत्रालयाच्या अधीन असलेल्या आर्म्ड व्हेईकल निगम लिमिटेड च्या अधिकृत संकेतस्थळाचं नुकसान करण्याचाही प्रयत्न केला. या संकेतस्थळाला पाकिस्तानचा झेंडा आणि एआयच्या मदतीने विद्रुप करण्यात आले.
भारतीय लष्कराने सांगितले की, खबरदारीचा उपास म्हणून आर्म्ड व्हेईकल निगम लिमिटेडच्या संकेतस्थळाला सध्यातरी तात्पुरतं बंद करण्यात आलं आहे. आता या संकेतस्थळाची पूर्ण तपासणी करून हॅकर्सनी त्याचं किती नुकसान केलं, याचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच या संकेतस्थळाची सुरक्षितता कायम राहावी, यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.