पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 05:23 IST2025-05-11T05:22:50+5:302025-05-11T05:23:34+5:30

नांगी टाकल्याचे केले नाटक, युद्धाची खुमखुमी कायम; शस्त्रसंधीनंतर तीन तासांतच आंतरराष्ट्रीय सीमा व नियंत्रण रेषेवर अंदाधुंद गोळीबार, ड्रोन हल्ले

pakistan ceasefire violations in the evening 7 Indians killed at night | पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू

पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली/जम्मू: पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तरामुळे विलक्षण कोंडी झालेल्या व भेदरलेल्या पाकिस्तानने अखेर शनिवारी नांगी टाकली व शस्त्रसंधी करण्यासाठी बाबापुता केला. दोन्ही बाजूंनी घोषणाही झाली. मात्र, घोषणेच्या तीन तासांनंतरच शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमा व नियंत्रण रेषेवर अंदाधुंद गोळीबार करत उखळी तोफांचा मारा केला. यात ७ नागरिकांचा मृत्यू झाला. तर सीमा सुरक्षा दलाचे आठ जवानही जखमी झाले आहेत. सारासार विचारांती भारताने होकार दिल्यानंतर शनिवारी संध्याकाळी ५ वाजेपासून शस्त्रसंधी लागू झाली होती.

भारत आणि पाकिस्तानने शस्त्रसंधी करण्याची तयारी दर्शविल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी जाहीर केले. अमेरिकेने मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही देशांत झालेल्या चर्चेतून हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. मध्यस्थी करत असलेल्या चर्चेनंतर ही सहमती झाल्याचे त्यांनी सांगितले. पण रात्रीचे चित्र पुन्हा युद्धासारखेच होते. 

पाकच्या कुरापतींमुळे कुठे-कुठे ब्लॅक आऊट?

शस्त्र संधीच्या उल्लंघनामुळे जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि पंजाबच्या अनेक जिल्ह्यांत ब्लॅक आऊट करण्यात आला. ती ठिकाणे अशी श्रीनगर, उधमपूर, अखनूर, नौशेरा, पुंछ, राजौरी, मॅधार, जम्मू, सुंदरबनी, आरएस पुरा, अनिया, कठुआ, रियासी, कटरा (जम्मू-काश्मीर) फिरोजपूर (पंजाब) आणि बाडमेर (राजस्थान).

दोन्ही देशांत काय आणि कसे घडले?

मिसी म्हणाले की, पाकिस्तानच्या डीजीएमओ यांनी भारताच्या डीजीएमओंशी शनिवारी दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी संपर्क साधला. त्यानंतर झालेल्या चर्चेतून संध्याकाळी पाच वाजल्यापासून शस्त्रसंधी नागू करण्याचा निर्णय घेतला. सीमेवर दोन्ही बाजूनी होणारा गोळीबार, क्षेपणास्त्र, ड्रोन यासारखे हवाई हल्ले थांबविण्यात आले.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी भारताचे
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, पाकचे परराष्ट्रमंत्री इशाक दार आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्याशी बोलणी केली. रुबिओ यांनी म्हटले आहे की, गेल्या ४८ तासांत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी आणि मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ, लष्करप्रमुख असीम मुनीर आदी लोकांशी चर्चा केली. त्यानंतर युद्धबंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला.

आता पुढे काय? सोमवारी चर्चा होणार का?

भारताने १४ मेपर्यंत बंद ठेवलेले ३२ विमानतळ उघडण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. दोन्ही देशांचे लष्करी संचालन महासंचालक (डीजीएमओ) १२ मे रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा एकदा संवाद साधतील. यावेळी पुढील पाठले काय उचलायची यावर चर्चा होईल.

सिंधू जलकराराची स्थगिती अद्याप भारताने उठविलेली नाही. तसेच दोन्ही देशांत सध्या व्यापारही होणार नाही. पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देण्याबाबतही भारताने काही निर्णय शनिवारी जाहीर केलेला नाही.

पिरपंजालमध्ये पुन्हा पाकचे ड्रोन पाडले

पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमा व नियंत्रण रेषेवर अंदाधुंद गोळीबार करत उखळी तोफांचा मारा केला. सीमाभागातील नौशहरा, अखनूर व सुंदरबनी क्षेत्रांत पाक सैन्याने अंदाधुंद गोळीबार केला. मात्र, काश्मीर सीमेवर झालेल्या गोळीबाराला रात्री उशिरापर्यंत अधिकृत दुजोरा मिळाला नव्हता. पाक सैन्याने आंतरराष्ट्रीय सीमेवर मोर्टार व मध्यम तोफांचा मारा केला. भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिल्याने चकमक उडाली. कठुआ सांजी वळण क्षेत्रात ड्रोन हल्ल्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही यावर एक्सवर पोस्टकरत शस्त्रसंधीचे काय झाले असा संतप्त सवाल केला आहे. त्यांनी हल्ल्याचा व्हिडीओही पोस्ट केला.

पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, लष्कराचे उत्तर

पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करित आहे. भारतीय सेना त्यांना योग्य प्रत्युत्तर देत आहे. शस्त्रसंधीचे उल्लंघन थांबविण्यासाठी पाकने त्वरित पावलं उचलावी, असे भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी रात्री उशिरा घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. कोणत्याही कारवाईला ठोस उत्तर देण्याचे आदेश भारतीय लष्कराला देण्यात आलेले आहेत, असेही मिसरी यांनी सांगितले.

युद्ध भारताचा हेतू नाही-डोवाल

युद्ध करणे हा भारताचा हेतू नाही आणि कोणाच्याही ते हिताचे नाही, असे मत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी दूरध्वनीवरून बोलताना व्यक्त केले. पहलगाम हल्ल्यात अनेक भारतीयांचे प्राण गेले. त्यामुळे कारवाई आवश्यक होती, असे डोवाल म्हणाले.

मोहम्मद इम्तियाज शहीद

काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात ड्रोनचा स्फोट झाला. एक बीएसएफ जवान शहीद झाला आणि सात जण जखमी झाले. ही घटना आरएसपुरा सेक्टरमध्ये घडली. यात उपनिरीक्षक मोहम्मद इम्तियाज यांना वीरमरण आले.

भारताने युद्ध लादले, आमचा विजय झाला; पाक पंतप्रधान शरीफ यांचा अजब दावा

भारताने युद्ध लादले, आमचा विजय झाला, असा अजब दावा पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केला. राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात ते म्हणाले, आम्हाला शस्त्रसंधी हवी आहे. भारताने लष्करी तळांवर थेट हल्ला करून अत्यावश्यक शस्त्रसाठा उद्ध्वस्त केला. ही थेट युद्ध छेडल्यासारखी कृती आहे, असा आरोपही त्यांनी केला. लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांचे नेतृत्व संकटाच्या काळात निर्णायक ठरल्याचे कौतुकही त्यांनी केले. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचे युद्धविरामासाठी आभार मानले. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, तुर्कस्तान, कतार, ब्रिटन आणि संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानला संकटाच्या वेळी साथ दिली. चीन पाकिस्तानचा खरा मित्र आहे. गेली ७८ वर्षे त्यांचा अढळ पाठिंबा आम्हाला लाभलेला आहे, असेही ते म्हणाले.
 

Web Title: pakistan ceasefire violations in the evening 7 Indians killed at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.