पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 14:10 IST2025-04-24T14:10:00+5:302025-04-24T14:10:39+5:30
Pahalgam Terror Attack: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या भारतात वास्तव्य करून असलेल्या नागरिकांना ४८ तासांमध्ये देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यावरून सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून २६ पर्यटकांचा बळी घेतल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. तसेच केंद्र सरकारनेही या दहशतवाद्यांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मुत्सद्देगिरीच्या पातळीवर काही निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये सध्या भारतात वास्तव्य करून असलेल्या नागरिकांना ४८ तासांमध्ये देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यावरून सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
सरकारच्या इमिग्रेशन विभागाकडून भारतात वास्तव्य करून असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांची माहिती मागवण्यात आली आहे. ४८ तासांच्या मुदतीनंतर भारतात राहिलेल्या पाकिस्तानी नागरिकांना पकडून माघारी पाठवण्याची कारवाई सुरू होईल. पाकिस्तानी नागरिकांना माघारी धाडण्यासाठी उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. त्यामध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील. केंद्र सरकारच्या आदेशांनुसार गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणा पुढच्या ४८ तासांपर्यंत भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांवर लक्ष ठेवतील.
या संदर्भात अधिक माहिती देताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या भारतात किती पाकिस्तानी नागरिक आहेत आणि ते कुठे आहेत, याबाबत इमिग्रेशन आणि परदेशी नागरिकांची नोंदणी करणाऱ्या कार्यालयांकडे विचारणा करण्यात आली आहे. नियमांनुसार पाकिस्तानी नागरिकांना अटारी बॉर्डर, रेल्वे स्टेशन आणि विमान तळांवरील इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडे आपली माहिती नोंदवावी लागेल. त्यामध्ये त्यांचं वास्तव्य असलेला पत्ताही द्यावा लागेल. सर्व इमिग्रेशन कार्यालये आज संध्याकाळपर्यंत आपला अहवाल सरकारकडे सोपवतील. त्यामध्ये किती नागरिक भारतामध्ये आहेत आणि किती माघारी परतले आहेत, याची माहिती दिली जाईल.
४८ तासांची मुदत ओलांडल्यानंतरही भारतात वास्तव्य करून राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना ताब्यात घेण्याचे आदेश त्यांचं वास्तव्य असलेल्या भागातील स्थानिक पोलिसांना दिले जातील. पोलीस या नागरिकांना ताब्यात घेऊन बसच्या माध्यमातून अटारी बॉर्डरवरून पाकिस्तानमध्ये पाठवतील. विशेष परिस्थितीत या नागरिकांना अटक करण्याची तरतूद आहे. मात्र सामान्य परिस्थितीत या अधिकाराचा वापर केला जाणार नाही.
या अधिकाऱ्याने सांगितले की, वैध कागदपत्रांसह भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांची इत्यंभूत माहिती केंद्र सरकारकडे आहे. सरकारी आदेशानुसार या नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत भारत सोडावा लागेल. पहगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने हे पाऊल उचलले आहे.