मंगळवारी काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी सुमारे २६ पर्यटकांची हत्या केली. या दहशतवाद्यांनी पर्यटकांचं नाव आणि धर्म विचारून धक्कादायक बाब समोर आली आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या कृत्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून, भारत सरकारनेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सीसीएसच्या बैठकीत पाकिस्तानविरोधात मुत्सद्देगिरीच्या पातळीवर काही कठोर निर्णय घेतले आहेत. मात्र या हल्ल्यामुळे कलम ३७० हटवल्यानंतर काश्मिरमध्ये काही प्रमाणात प्रस्थापित होत असलेल्या शांततेला आणि काश्मीरमधील अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पहलगाममधील हल्ल्याचा परिणाम काश्मीरमधील सर्व क्षेत्रांवर होण्याची शक्यता आहे. त्यातही पर्यटन क्षेत्रावर या हल्ल्याचे विपरित परिणाम होऊ शकतात. या घटनेनंतर हॉटेल, कंपन्या आणि व्यापार सुरू करण्याचा विचार करत असलेल्या गुंतवणुकदारांना मोठा धक्का बसू शकतो. आता या हल्ल्यामुळे देशाला कोणकोणते १० तोटे होऊ शकतात, याचा आपण थोडक्यात आढावा घेऊयात.
काश्मीर आणि देशाला होणार हे १० तोटे -पहलगाममधील हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यात देश आणि विदेशातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटू शकते. त्याचा परिणाम हॉटेल, टॅक्सी सेवा, टुरिस्ट गाईड आणि दुकानदारांवर थेट परिणाम होऊ शकतो. -औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार सुरक्षेबाबत सावध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १.६३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक प्रभावित होण्याची शक्यता आहे.- सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेत जम्मू-काश्मीरचा वाटा ०.८ टक्के एवढा आहे. मात्र या हल्ल्यामुळे पर्यटन आणि गुंतवणूक घटू शकते. त्यामुळे देशाच्या जीडीपीमधील काश्मीरचा वाटा घटू शकतो. -जम्मू काश्मीरमधील दरडोई उत्पन्न २०२४-२५ मध्ये १.५५ लाखांवर पोहोचलं होतं. ते मागच्या १० वर्षांत १४८ टक्क्यांनी वाढलं होतं. मात्र ते आता घटू शकतो. - जम्मू आणणि काश्मीरमधील ६१.७ टक्के जीएसव्हीए सेवा क्षेत्रामधून येतं. त्यात पर्यटनाची भूमिका मुख्य आहे. या क्षेत्रामधील वाढीला फटका बसू शकतो.- जम्मू काश्मीरच्या जीएसव्हीएमध्ये बांधकाम क्षेत्राचा १८.३ टक्के वाटा आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्रालाही फटका बसू शकतो.- केंद्र सरकारने हल्लीच २८४० कोटी रुपयांची तरतूद करत उद्योग योजनेच्या माध्यमातून ९७१ प्रकल्पांना मान्यता दिली होती. त्यालाही उशीर होऊ शकतो. - त्याबरोबरच परिवहन, बँकिंग, बाजार आणि हस्तशिल्पापर्यंतचे सहाय्यक उद्योगधंदे अडचणीत येण्याची शक्यता आहे. पर्यटन उद्योग मंदावल्याने या क्षेत्रातील कर्ज थकण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक बँकांवर दबाव वाढू शकतो. - त्याशिवाय काश्मीरमधील शेती आणि बागायती क्षेत्रावरही या दहशतवादी हल्ल्याचा परिणाम होऊ शकतो. -सर्वात महत्त्वाचं म्हणजे काश्मीरमधील बेरोजगारीचा दर जो २०१९-२० मध्ये ६.७ टक्के होता तो २०२३-२४ मध्ये घटून ६.१ टक्के झाला होता. मात्र आता तो पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.