पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 16:42 IST2025-04-28T16:41:49+5:302025-04-28T16:42:21+5:30
Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांकडून विविध विधाने येत आहेत.

पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशातून पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जाहीर केले आहे की, या हल्ल्यातील दहशतवाद्यांना कल्पनेपलीकडे शिक्षा भोगावी लागेल. पण, दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी पहलगाम हल्ल्यावर वादग्रस्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता या या सर्व प्रतिक्रियांवर राहुल गांधी नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.
राहुल गांधी नाराज
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरील सर्वपक्षीय बैठकीनंतर मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी सरकारसोबत असल्याचे म्हटले आहे. पण, काही काँग्रेस नेते या घटनेबाबत वादग्रस्त विधाने देत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल गांधी काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रियांवर नाराज आहेत. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही आक्षेप व्यक्त केला आहे. तसेच, आता पक्षाच्या नेत्यांना काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर झालेल्या ठरावापेक्षा वेगळी विधाने जारी न करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.
युद्धाची गरज नाही - सिद्धरामय्या
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले होते की, पाकिस्तानशी युद्धाची गरज नाही. आम्ही युद्धाच्या बाजूने नाही. या विधानावरून भाजपने सिद्धरामय्या तसेच काँग्रेसवरही निशाणा साधला. भाजपने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध अनेक ठिकाणी निदर्शनेही केली. मुख्यमंत्र्यांशिवाय, कर्नाटक सरकारमधील एका मंत्र्यांनीही वादग्रस्त वक्तव्य केले. दहशतवाद्यांनी धर्म विचारुन हल्ला केलाय नाही, असे ते म्हणाले. यावरुनही मोठा वाद झाला आहे.
राहुल गांधींनी घेतली जखमींची भेट
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी (25 एप्रिल) पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील जखमी आणि पीडितांची भेट घेतली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत ते म्हणाले की, जे काही घडले आहे, ते समाजात फूट पाडण्याच्या उद्देशाने घडले आहे. ही घटना म्हणजे, भावाला भावाविरुद्ध उभे करण्याचे षड्यंत्र आहे. अशा परिस्थितीत, प्रत्येक भारतीयाने एकत्र येऊन दहशतवाद्यांचे नापाक प्रयत्न हाणून पाडणे गरजेचे आहे.